म्हणून डिकॉकसोबत पंगा घेतला, वॉर्नरची कबुली

0

सिडनी । दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याच्यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डिकॉकमध्ये तुफान राडा झाला. या दोघांमध्ये हाणामारी व्हायचीच बाकी होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. यानंतर आता डेव्हिड वॉर्नरने या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. डिकॉकनं माझ्या पत्नीबाबत अभद्र टिप्पणी केल्यामुळे मी चिडलो आणि त्याच्या अंगावर धावून गेलो, असे डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे. मी नेहमीच माझ्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहिन, असे वक्तव्य डेव्हिड वॉर्नरने केले आहे. ड्रेसिंग रूममध्ये जाताना डिकॉकच्या वक्तव्यानंतर माझा ताबा सुटला, अशी कबुली वॉर्नरने दिली.

दुसर्‍या संघातील खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी माझ्यावर टिप्पणी केली तरी मला फरक पडणार नाही पण पत्नीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे माझा पारा चढला, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली. झालेल्या प्रकाराबद्दल मला खेद आहे, असेही वॉर्नर म्हणाला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्ता चौथ्या दिवशी ही घटना घडली. चहापानावेळी ड्रेसिंग रूममध्ये जात असताना वॉर्नर आणि डिकॉकमध्ये बाचाबाची झाली. यानंतर आयसीसीने वॉर्नरची 75 टक्के सामना फी कापली. तसेच त्याच्या खात्यामध्ये 3 डिमेरिट पॉईंट दिले. डिकॉकवरही कारवाई म्हणून 25 टक्के फी कापण्यात आली.