म्हणून मोहम्मद शमी आयपीएलमध्ये होतोय अयशस्वी

0

मुंबई । आयपीएलच्या 11व्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्स नवीन संघ आणि नव्या कर्णधारासह मैदानात उतरले. मात्र, तरीही म्हणावी तशी त्यांची कामगिरी झाली नाही. सहापैकी पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे गौतम गंभीरने कर्णधारपद सोडले. त्यामुळे आता कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरवर सोपवण्यात आली आहे. मात्र, तरीही संघाची समस्या मात्र कायम आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात कायम ठेवले होते. पण नवा मोसम सुरु होण्याआधीच शमी वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. त्यामुळे आयपीएलमध्ये म्हणावी तशी छाप त्याला सोडता आली नाही. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात त्याने फक्त 3 विकेट्स मिळवल्या आहेत, तर प्रति षटकांमागे 9 च्या सरासरीने त्याने धावा दिल्या आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सला शमीकडून अतिशय चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो तसं करु शकला नाही.

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स याबाबत बोलताना म्हणाला की, खासगी आयुष्यातील समस्यांमुळे त्याची कामगिरी खालावली आहे.मला वाटते की, तो खासगी आयुष्यातील समस्यांशी झगडत आहे. अशावेळी लक्ष केंद्रित होणे कठीण असते. मैदानात चांगलं प्रदर्शन करण्याआधी तुम्ही तुमच्या समस्या मिटवण्याचा कायम प्रयत्न करता. पण तसे झाले नाही तर तुमचे मैदानात लक्ष केंद्रित होत नाही. त्याला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच काही वेळ लागेल. पण हा हंगाम त्याच्यासाठी अद्याप संपलेला नाही. अजूनही बरेच सामने शिल्लक आहेत. असे होप्स म्हणाला.

दरम्यान, शमीची पत्नी हसीन जहाँ हिने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसात तक्रार केली आहे. तसंच तिने शमीवर मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोपही केले आहेत. याच दरम्यान, कार अपघातात तो गंभीर जखमीही झाला होता. या सर्व प्रकारामुळे त्याला आयपीएल सुरू होण्याआधी म्हणावा तसा सराव करता आला नाही. त्याचाच परिणाम आयपीएलमधील सामन्यांमध्येही पाहायला मिळत आहे.