नवी दिल्ली । वेस्ट इंडिजसोबत झालेल्या कालच्या सामन्यात टिम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींनमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र आता या पराभवाचे नेमके कारण समोर आले आहे. 50 षटकांच्या या एकदिवसीय सामन्यातील 21 ते 40 या षटकांमध्येच टिम इंडियाच्या पराभवाचं कारण दडलेले आहे. या 20 षटकांमध्ये महेंद्र सिंग धोनी खेळपट्टीवर होता. त्यामुळे या पराभवानंतर त्याच्यावरही टिका केली जात आहे.
120 चेंडूत अवघ्या 54 धावा
वेस्ट इंडिजसोबत खेळवल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना टिम इंडिया हरली. या पराभवामुळे टिम इंडियावर टिकेची झोड उठवली जात आहे. तसेच क्रीडा विश्लेषकांकडून या पराभवाची कारणेही शोधली जात आहेत. टिम इंडिया हा सामना संथगतीने फलंदाजी केल्यामुळे हरला आहे, असा निष्कर्ष काढला गेला आहे. याचे कारण म्हणजे, 21 ते 40 या 20 षटकांदरम्यान टिम इंडियाने केवळ 54 धावा काढल्या. तसेच या 20 षटकांमध्ये केवळ एकच चौकार मारण्यात आला. इतकेच नाहीतर या 20 षटकांमध्ये सर्वाधिक 5 धावा आल्या त्या 39व्या षटकामध्ये… या 20 षटकांमध्ये महेंद्र सिंग धोनी याने सर्वाधिक चेंडूंचा सामना केला. त्याने 65 चेंडूंमध्ये 36.92 च्या स्ट्राइक रेटने केवळ 24 धावा बनवल्या. याच 20 षटकांमध्ये वेस्ट इंडिजने त्यांच्या फलंदाजीदरम्यान एकूण 88 धावा कुटल्या होत्या.
21- 40 षटकांमधील फलंदाजांची कामगिरी महेंद्र सिंग धोनी – 65 चेंडूंमध्ये एकूण 24 धावा. यात एकही चौकार किंवा षटकार नाही. अजिंक्य रहाणे- 31 चेंडूंमध्ये एकूण 14 धावा. यात एकही चौकार किंवा षटकार नाही. केदार जाधव- 14 चेंडूंमध्ये एकूण 10 धावा. यात एकही चौकार किंवा षटकार लगवण्यात आला नाही. हार्दिक पांड्या- 10 चेंडूंमध्ये एकूण 5 धावा.यात केवळ एक चौकार.