…म्हणून हातात घेतले होते ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर; अखेर युवतीकडून स्पष्टीकरण !

0

मुंबई: जेएनयूत झालेल्या हिंसाचाराचा निषेधार्थ केलेल्या आंदोलनावेळी फ्री काश्मीरचे पोस्टर झळकले. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. हे पोस्टर प्रकरण महाराष्ट्रात घडल्याने भाजपकडून शिवसेनेवर आरोप होत आहे. दरम्यान ज्या तरुणीने हे पोस्टर हातात घेतले होते. तिने यामागील कारण स्पष्ट केले आहे. मेहक मिर्झा प्रभू असे या युवतीचे नाव आहे.तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.

मेहकने आपण जे पोस्टर घेऊन उभे होतो ते तिथेच पडलेले होते. काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल सेवा सुरळीत व्हावी या एकमेव इच्छेखातर मी ते पोस्टर हातात घेतले होते. तेथील लोकांना मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. या अर्थाने ते पोस्टर होते असे तरुणीने स्पष्ट केले आहे.मी काश्मिरी नसून मुंबईची राहणारी आहे असे तरुणीने म्हटले आहे.

मुंबई झोन-१ चे डीसीपी संग्राम सिंह यांनी या घटनेसंबंधी बोलताना या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याची माहिती दिली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार का? तसंच जी तरुणी पोस्टर घेऊन उभी होती तिची ओळख पटवली जाईल का? असं विचारलं असता त्यांनी नक्कीच केलं जाईल असं सांगितलं होतं. दरम्यान पोलिसांनी सकाळी गेटवे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना आझाद मैदानात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आंदोलकांना संवेदनशील असणाऱ्या या ठिकाणी आंदोलन न करता लवकरात लवकर जागा रिकामी करण्याची विनंती केली होती. पण आंदोलकांनी नकार देत पोलिसांविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलकांना आझाद मैदानात नेलं. आझाद मैदानात नेलं असता काही वेळातच आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.