हैदराबाद । “आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना जनतेसमोरच गोळ्या घातल्या पाहिजेत!” असे वक्तव्य करून वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी नवीन वादाला आमंत्रण दिले आहे.
नायडू हे मुख्यमंत्री नव्हे तर ठकसेन असल्याची शेलकी टीकादेखील त्यांनी केली असून यामुळे आंध्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
काय म्हणाले जगनमोहन ?
कुर्नुल जिल्ह्यातील नंदयाल येथे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जाहीर सभेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी यांना लक्ष्य केले. नायडूंनी निवडणुकांमध्ये जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अशा मुख्यमंत्र्यांना भरचौकात जनतेसमोरच गोळ्या घातल्या तर चुकीचं ठरणार नाही, असं रेड्डी म्हणाले. चंद्राबाबू हे मुख्यमंत्री नव्हेत तर मुख्यकंत्री (ठकसेन) आहेत. नायडूंनी राज्यातील शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, बेरोजगार तरुणांना अनेक आश्वासनं दिली. पण ती पूर्ण केली नाहीत. नायडू हे कलियुगातील राक्षस असल्याची टीकाही त्यांनी केली.
तेलगू देसम आक्रमक
जगनमोहन रेड्डी यांच्या टिकेने आंध्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्याविरोधात तेलगू देसम पक्षाच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. या पक्षाचे नेते एस. राजशेखर यांनीही रेड्डी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याशिवाय कृष्णा जिल्ह्यातील पक्षाचे अध्यक्ष डी. अविनाश यांनीही रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच अनेक ठिकाणी रेड्डी यांच्या पुतळ्यांचे दहनही करून निषेध व्यक्त करण्यात आला.