नवी दिल्ली : दिल्लीतील बाबा हरदास नगर परिसरात कथित गोरक्षकांनी म्हशींची वाहतूक करणार्या सहा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे गोरक्षकांकडून होणार्या मारहाणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मारहाण झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. शनिवारी सकाळी काही लोक सहा वाहनांमधून म्हशी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच कथित गोरक्षकांनी त्यांची वाहने अडवली व वाहनांमध्ये असलेल्या सहा जणांना खाली उतरण्याचे फर्मान सोडले, ते खाली उतरताच या गोरक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांनंतर या जमावाने वाहनांमधील म्हशींची सुटका केली वाहनांचीही तोडफोड केली. या कथित गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत अली जान याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अली जान यांच्या मुलाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला.