साक्री । साक्री तालुक्यात म्हसदी येथील बागायतदार शेतकरी शाम शंकर देवरे यांना खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्यावतीने कृषीभूषण पुरस्कार देऊन विशेष कार्यक्रमातून सन्मानित करण्यात आले. धुळे येथील खान्देश वारकरी सेवा मंडळातर्फे दरवर्षी वारकरी रत्न, वारकरी भूषण यासोबतच कृषीभूषण पुरस्कार दिले जातात. त्यानुसार कृषीभूषण पुरस्कारासाठी बागायतदार शेतकरी शाम देवरे यांची निवड करण्यात आली होती.
शेतीमध्ये विविध प्रयोग करून करताहेत मार्गदर्शन
देवरे यांनी 2007 पासून डाळींब बागेला प्रारंभ केला. डाळींब बागेतच त्यांनी आंतरपिक म्हणून भुईमुग, कांदा, टमाटा, वांगे यासारखी पिके घेतली. त्यांनी बागेत आरक्ता(मृदुला) नावाच्या डाळींबाचे पिक घेतले. बाजारपेठेत आरक्ताला मागणी वाढल्याने देवरे यांच्या बागेतील डाळींब बनारस, कलकत्ता, लखनऊ, पटना यासारख्या राज्यामध्ये गेला. परिणामी परराज्यातील शेतकर्यांनी व व्यापार्यांनी देखील बागेला भेटी दिल्या. देवरे मात्र एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या शेतातील बांधावर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण केले. याचीच दखल घेऊन देवरेंना जिल्हास्तरीय कृषीभूषण पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी काळगावचे हभप भटु भिला खैरनार अध्यक्षस्थानी होते. तर महापौर कल्पना महाले, शिक्षण मंडळाचे सभापती संदीप महाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, भोंगे महाराज(शिरपूर), प्रमोद महाराज, रुपचंद महाराज, चंद्रकांत महाराज, मच्छिंद्र महाराज, हिरामण गवळी, बापू शेलार, पंकज दुसाने, रामविजय भामरे, बापू महाराज आदींच्याहस्ते यावेळी पुरस्कार प्रदान सोहळा पार पाडला. यावेळी सुनिल वाघ यांनी प्रास्ताविक केले. हभप राजेंद्र मुर्तंडकर व हभप प्रा.उमेश गांगुर्डे यांनी सुत्रसंचालन केले तर हिरामण गवळींनी आभार मानले.