म्हसळा । गेली अनेक वर्षे म्हसळा शहरात विविध राजकीय पक्ष, मंडळ, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बॅनर ने दिघी नाका, एस.टी. स्टँड परिसर व अनेक शासकीय इमारती या बॅनरच्या विळख्यात सापडल्या होत्या. या बॅनरच्या विळख्यातून म्हसळा शहराला मुक्त करण्याचे काम म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी करून दाखविले आहे. मुख्याधिकारी गारवे यांच्या या निर्णयाचे म्हसळा शहरातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. म्हसळा शहरातील सार्वजनिक बांधकाम व ग्रामीण पाणी पुरावठा कार्यालयाच्या, रा.जी.प. शाळा नं. 1.च्या, पोलीस ठाण्याच्या, म्हसळा ग्रामीण रुग्णालय या शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर गेली अनेक वर्षे विनापरवानगी विविध राजकीय पक्ष, मंडळ, व तालुक्यातील निरनिराळ्या कार्यक्रमांचे बॅनर लागत असत परंतु आता म्हसळा शहरात कोणताही बॅनर अथवा पोस्टर लावायचा असेल तर म्हसळा नगरपंचायत ची परवानगी अनिवार्य आहे असा निर्णय मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घेतला आहे. सर्व राजकीय पक्ष त्याचप्रमाणे नागरीकांकडुन या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
म्हसळा नागरपंचायत हद्दीत मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तसेच सार्वजनिक स्थळ विद्रुपीकरण अधिनियम नुसार अनाधिकृत बॅनर, पोस्टरवर कारवाई करण्यात येईल. नगरपंचायत हद्दीत नगरपंचायत च्या परवानगीनेच व शासकीय आकारणी केल्यानंतरच विहित मुदतीसाठीच परवानगी देण्यात येईल. यापुढे शहरात एकही विनापरवानगी बॅनर दिसणार नाही.
– वैभव गारवे, मुख्याधिकारी,
नगरपंचायत, म्हसळा
आमच्या पक्षाचे बॅनर आम्ही यापूर्वीही परवानगी घेऊंनच लावायचो व यापुढेही नगरपंचायतची रीतसर परवानगी घेऊनच पक्षाच्या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात येतील. मुख्याधिकारी यांनी घेतलेला सदर निर्णय योग्यच आहे.
– शैलेशकुमार पटेल, भाजप,
म्हसळा तालुका अध्यक्ष