म्हसळा शहरातून गुटख्याचा पुरवठा, प्रशासनाचे दुर्लक्ष

0

मुरूड जंजिरा । महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी आहे. मात्र, तरीही रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा हा चूप चूप के पद्धतीने विकला जात असून म्हसळा तालुक्यातून या गुटख्याच्या पुरवठा होत असल्याची विशेष माहिती काही किरकोळ दुकानदारांनी नाव न सांगण्याचा अटीवर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक पानटपरीधारक व इतर दुकानदार यांनी केवळ वरकमाईसाठी गुटखा पाकिटे अवैध मार्गाने खरेदी करून विक्री सुरू ठेवल्याने या गुटखाबंदीचा जिल्ह्यात प्रशासनाच्या वरदहस्ताने फज्जा उडाला आहे. वृत्तपत्रात गुटख्याबाबत वृत्त येताच प्रशासनाचे अधिकारी किरकोळ एखाद-टपरीधारकांवर कारवाई करून वेळ मारून नेतात व ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’, असे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळते.

जिल्ह्यात शासकीय कार्यलाय, शाळा, बसस्थानक आदी भागात पानटपरी, किराणा दुकानांमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. अवैध गुटखाविक्री करणार्‍यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असल्याने पोलीस त्यांच्याकडे बोट दाखूवन कारवाई करत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच शहरात व परिसरात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. या अवैध विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे, यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. शासनाने गुटखा बंदीचा कायदा केला. मात्र, बंदीमुळे सध्या गुटखा तिप्पट ते चौपट किंमत घेवून विकला जात आहे. स्थानिक माफीया गुटखा पॅकेटला कागद गुंडाळून विक्री करतात. गुटखा विक्री करणार्‍या टोळ्या जिल्ह्यात कार्यरत असल्यामुळे यावर कारवाई होणार तरी कधी? असा प्रश्‍ना उपस्थित केला जात आहे.रायगड जिल्ह्यात गुटखाबंदीचा पूर्ण फज्जा उडाला असून शासनाची गुटखाबंदी खरच आहे का? असा गंभीर प्रश्‍नग उपस्थित केला जात आहे. सर्वच पान टपर्‍यांवर गुटख्याची विक्री होत असून, गुटखा विक्री करणार्‍यांचे पूर्ण रॅकेटच संपूर्ण परिसरात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गुटखा खाणार्‍यांना गुटखा विक्रीची दुकाने सापडतात. मात्र, अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना त्याचा पत्ता का लागत नाही? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्‍न आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुटखा चोरट्या मार्गाने आयात होतो आणि तो खुलेआम विकला जातो. अनेक गुटखा व्यापार्‍यांची मोठी गोडाउनही ग्रामीण भागात आहे. 18 वषार्ंखालील कुणीही तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी विक्री करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानंतरही शाळांसमोर गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. शाळकरी मुलांना मुख्य लक्ष केले जात आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे. मात्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात ह्या राज्यामधून गुटखा रोज शेकडो प्रवासी वाहतूक करणार्यात कोकण रेल्वे, ट्रॅव्हल्स बसेसमार्फत माणगाव येथे येत असतो.त्यात प्रवाशांचे सामान ठेवण्याकरिता ट्रॅव्हल्समध्ये मोठी जागा उपलब्ध असते. त्याचाच फायदा घेत या वाहतूकदारांना हाताशी धरून शेजारील राज्यातून गुटख्याच्या गोणी तालुक्यात आणल्या जातात. सदर बसेस रात्रीचा प्रवास करून पहाटेच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होतात. त्यानंतर त्यांना सांगितलेल्या तालुक्यातील मुख्य मार्गापासून थोड्या अंतरावर हे बस चालक आपली बस उभी करतात आणि तेथून नंतर मोठे होलसेलर हा गुटखा वाहनाने तालुक्यात रिटेलअरपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात.