म्हसळ्यात सर्व शिक्षक संघटनांचा शालेय ऑनलाइन कामावर बहिष्कार

0

म्हसळा। RTE 2009 च्या शिक्षण कायद्यान्वये शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम करू द्यावे असे सुचवले आहे. त्यामुळे यापुढे शासनाकडून प्रत्येक शाळेत संगणक व इंटरनेट सुविधा तसेच ते काम करण्यासाठी संगणक ऑपरेटर मिळेपर्यंत ऑनलाइन कोणतेही काम न करण्याचा निर्णय म्हसळा तालुक्यातील या सर्व शिक्षक संघटनांनी घेतला आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांची सभा म्हसळा येथे संपन्न झाली. शिक्षकांनी पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसमोर राहावे ही आमची सर्व संघटनांची मागणी आहे. मात्र, शासनाने मागील दोन तीन वर्षांपासून वेगवेगळी शालेय कामे ऑनलाइन करण्याचे अवलंबले आहे.

शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण
साहजिकच ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून शाळांना पर्यायाने शिक्षकांना भरावी लागत आहे. म्हसळा तालुका हा डोंगरी भागात असून म्हसळ्यातील बहुतांश शाळा अतिदुर्गम आहेत. अशा शाळांना इंटरनेटच्या कोणत्याही सुविधा शासनाने पुरवल्या नाहीत आणि ऑनलाइनचे सर्व काम शिक्षकांवर लादले आहे. यामुळे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्याचा वाईट परिणाम शालेय कामकाजावर होत आहे. शिक्षकांना स्वतःचा मोबाइल, रोजचा रिचार्ज, रेंज नाही, नेट नाही, अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.