म्हसावदच्या वीटभट्टी कामगाराचा नदीत बुडून मृत्यू

0

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची घटना 27 रोजी समोर आली आहे. हिरालाल रतन कुंभार (वय 40 रा. कुंभारवाडा, म्हसावद ) असे मयताचे नाव असून पोहता येत नसल्याने नदीपात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरालाल रतन कुंभार हे वीट भट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. 25 रोजी कुणाला काही एक न संगता ते घरातून निघून गेले होते. त्यानुसर नातेवाईक त्यांचा शोध घेत असतांना 27 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास नदी पात्राजवळील वीट भट्टी मजुरांना नदी पात्रात हिरालाल त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, मजुरांनी हिरालाल कुंभार यांच्या परिवाराला या बाबत माहिती दिली असता परिवारातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्च्यात पत्नी, 6 मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे.