अचानक छापा टाकल्याने परीसरात रेशन दुकानदारांमध्ये खळबळ
। जळगाव प्रतिनिधी ।
रेशन दुकानांतून ई पॉज मशिनचा वापर न करता चिठ्याद्वारे धान्य वितरण करणार्या म्हसावद (ता.धरणगाव) येथील तीन धान्य दुकानदारांवर कारवाईचा बडगा जिल्हा पुरवठा विभागाने उचलला आहे. रविवार 20 ऑगस्ट रोजी दूपारी 2 वाजेच्या सुमारास पुरवठा विभागाच्या एका पथकाने अचानक छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी तीन तालुका पुरवठा निरीक्षकांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशानूसार जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, सहाय्यक पुरवठा अधिकारी विलास हरिमकर, योगेश पाटील, किशोर पवार, ओरॅसिसचे सुरेंद्र भोळे यांच्या पथकाने म्हसावदला सुनिता अमृतकर, रविंद्र शिरवे, संजय वाणी यांच्या दुकानांवर अचानक छापा टाकला. त्यात ते कशा पध्दतीने धान्य वितरण करतात याची पाहणी केली.
जिल्हाधिकार्यांकडे अहवाल
रेशन दुकानदारांनी ‘ई पॉज’ मशिन कपाटात पॅक करून ठेवल्याचे आढळून आले. रेशन कार्ड धारकांना चिठ्ठ्याद्वारे धान्य वितरीत करीत असल्याचे आढळून आले. यात साठा व विक्रीत यात वीस ते पंचवीस क्विंटलची तफावत आढळून आली. पथकाने बंद मशिन ताब्यात घेतले आहे. जीवनावश्यक कायद्यानूसार आज सोमवार 21 रोजी गुन्हे दाखल का करण्यात येवू नयेत? अशी नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान, सोबतच तालुका पुरवठा निरीक्षक दीपक कूसकर, श्री.तडवी, श्री.जाधव यांनी निरीक्षणात या दुकानदारांवर कारवाई का नाही केली? याबाबत शिस्तभंगाची कारवाईबाबत जिल्हाधिकार्रांना अहवाल सादर केला जाणार आहे.