मुंबई । गेले कित्येक वर्षे हक्काच्या घरापासून वंचित राहिलेले संक्रमण शिबिरातील रहिवासी आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यांच्या घरांबाबतही म्हाडाचे अधिकारी कशी फसवणूक करतात याचा पर्दाफाश मास्टरलिस्टमधील फसवणूक झालेल्या रहिवाशांनीच समोर आणला आहे. मास्टरलिस्टमधील एक दोन नव्हे तर तब्बल 280 घरे बनावट कागदपत्र बनवून लाटण्यात आली आहेत. तर मास्टरलिस्टमधील 40 रहिवाशांच्या मूळ फायलीच म्हाडातून गायब करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनने केला आहे. त्यामुळे मूळ रहिवाशांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गेल्या 42 वर्षांपासून आम्ही बेघर आहोत. हक्काची घरे दुसर्याला दिली आहेत. त्यामुळे मी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केल्याचे तक्रारदार रविंद पाबरेकर यांनी सांगितले.
दलाल आणि अधिकार्यांच्या संगनमताने सुरू आहे काळा धंदा
दलाल आणि भ्रष्ट अधिकार्यांच्या संगनमताने मास्टरलिस्ट आणि संक्रमण शिबिरातील घरे लाटण्याचा काळाधंदा म्हाडामध्ये सुरू आहे. याविषयी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडे आणि दक्षता विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या. पण कोणतीही कारवाई न झाल्याने ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनने आता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा मागणी करण्यात येणार असल्याचे ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पेठे म्हणाले.
20 लाखांत होतेय घरांची विक्री
उपकरप्राप्त इमारतीतील मूळ रहिवाशाला मास्टरलिस्टअंतर्गत दोन घरे वितरीत करण्यात आली. अशी अंदाजे 70 घरे वितरित करण्यात आली. दोनपेक्षा अधिक घरांचे वितरण मूळ रहिवाशाच्या नावाखाली बोगस रहिवाशांना करण्यात आले. 25 ते 30 लाखांत संक्रमण शिबिरातील घरांची विक्री केली जात असल्याचा आरोप ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनने केला आहे. संक्रमण शिबिरातील घरे ही तात्पुरती रहिवाशांना वितरीत केली जातात. अशावेळी या घरांची बनावट कागदपत्रे तयार करत दलाल आणि म्हाडा अधिकारी या घरांची विक्री करत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.