मुंबई : म्हाडाच्या घरसोडतीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत 10 डिसेंबर होती. त्यामुळे अर्जदारांचे लक्ष आता 16 डिसेंबरला होणार्या लॉटरीच्या घोषणेकडे लागले आहे. म्हाडाच्या घरांसाठी एकूण 4 गटांसाठी 1 लाख 64 हजार अर्ज आले आहेत. स्वीकृत अर्जांची यादी शुक्रवारी 14 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लॉटरीची सोडत रविवारी काढण्यात येणार आहे. यावेळी म्हाडाने सायन, वडाळा, ग्रँट रोड, चेंबूर, घाटकोपर, कांदिवली पश्चिम, गोरेगाव पूर्व आणि पश्चिम, मालाड, बोरिवली, दहिसर, माटुंगा, दादर, अँटॉप हिल, विक्रोळी पूर्व, मानखुर्द, पवई आणि मुलुंड येथील 1 हजार 384 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. मागील लॉटरीच्या तुलनेत म्हाडाच्या या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्जदारांची संख्या 2017 च्या लॉटरीपेक्षा दुपटीने वाढली आहे. काही प्रमाणात घराच्या कमी केलेल्या किमतीमुळे हा प्रतिसाद मिळाल्याचे म्हाडाकडून सांगण्यात येत आहे. लॉटरीच्या सोडत प्रकियेत पारदर्शकता यावी यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे.