मुंबई । मुंबई आणि मराठी भाषिक भाग म्हटले की, लालबाग, परळ हा भाग आठवतो, प्रत्येक मराठी माणसाची कोणत्या कोणत्या नातेवाईकाच्या रूपाने या भागाशी नाळ जोडलेली होती. ‘मुंबई मराठी माणसाचीच’ अशी छातीठोकपणे गर्जना या भागातील मराठी भाषिक करतो, मात्र कालांतराने या भागातील गिरण्या बंद पडल्या, बेकारी आली, त्यानंतर परराज्यातील नागरिकांची घुसखोरी, मुंबईत जमिनींचे वाढते भाव, त्यानंतर मुंबईतील गिरण्या आणि चाळी पाडून त्यावर कमर्शियल सेंटरची उभारणी होणे असा प्रवास मुंबईचा सुरू झाला आणि मराठी माणूस विरार, कल्याण-डोंबिवली, पनवेल अशा भागात फेकला गेला.
पुन्हा मराठी भाणसाला मुंबईत प्रवेश करण्याची इच्छा झाली म्हणून त्याने म्हाडाच्या घरांची प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचली, तेव्हा लोअर परळ भागात उच्च उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यात आली असून त्यांची किंमत तब्बल दीड ते 2 कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यावरून आता राज्य शासनाने मराठी माणसाला मुंबईत प्रवेश निषिद्ध केला, असे चित्र दिसत आहे.
महिन्याला दीड लाख रुपयांवर पगार घेणार्या तसेच भत्ता, रेल्वे, एसटी, रुग्णालयात सवलत मिळणार्या आणि मुंबईत आमदार निवास असलेल्या आमदारांना म्हाडाने अल्प गटात राखीव घरे ठेवली आहेत. अल्प उत्पन्न गटात चार घरे राखीव ठेवण्यात आली असून कन्नमवार नगरमध्ये 3, तर चारकोप कांदीवली 1 घर आहे. दोन्ही घरांची प्रत्येकी किंमत 35 लाख रुपये इतकी आहे. मध्य उत्पन्न गटात 5 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 (प्रत्येकी 35 लाख), उन्नतनगर, गोरेगावमध्ये 1 (41 लाख), चारकोप कांदिवली 1 (42 लाख), चारकोप कांदिवली (37 लाख). उच्च उत्पन्न गटात 7 घरं राखीव असून लोअर परळ 1 (1 कोटी 43 लाख), तुंगा पवई 4 (प्रत्येकी 1 कोटी 40 लाख), चारकोप कांदिवली 1 (73 लाख), शिंपोली कांदिवली 1, (75 लाख) घरं आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
मराठी माणसाचा अपेक्षाभंग
म्हाडाच्या घरांची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहून मुंबईत घराचे स्वप्न पाहणार्या मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला आहे. म्हाडाच्या एकूण 819 घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यापैकी तब्बल 204 घरांची किंमत तब्बल दीड ते दोन कोटींच्या आसपास आहे आणि ही सर्व घरे नेमकी परळ, लालबाग या भागात बांधण्यात आलेली आहेत. लोअर परळमधील उच्च उत्पन्न घटातील दोन घराची किंमत प्रत्येकी दोन कोटीच्या जवळपास आहे. 44.21 चौ. मी. असलेल्या एका घराची किंमत 1 कोटी 95 लाख 67 हजार 103 रुपये आहे. 33.82 चौ.मी. घरासाठी 1 कोटी 42 लाख 96 हजार 517 रुपये आहे. उच्च उत्पन्न गटात दीड कोटी रुपये किंमत असलेली 34 घरेही इथेच आहेत.