नगरसेवक यांची मागणी
पिंपरी : पिंपरी, मोरवाडी येथील म्हाडाच्या नवीन प्रकल्पाचे काम पूर्ण झाला आहे. परंतु, म्हाडाने मोकळी जागा 15 वर्षांपासून विकसित केली नाही. ही जागा विकसित करुन त्यांनी पालिकेच्या ताब्यात दिली नाही. त्यामुळे म्हाडाच्या प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, अशी मागणी संत ज्ञानेश्वर सहकारी गृहरचना फेडरेशनचे अध्यक्ष व नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. तसेच म्हाडा परिसरात गुन्हेगारी वाढली असून या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देखील समस्यांबाबत पत्र देण्यात आले आहे.
सदनिका धारकांवर अन्याय
पालकमंत्र्यांनी म्हाडाचे अधिकारी, म्हाडा फेडरेशनचे पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, मोरवाडी येथे म्हाडाने 20 वर्षापूर्वी सुमारे 1185 सदनिका बांधल्या आहेत. तथापि, म्हाडाने आजपर्यंत मोकळी जागा विकसित केली नाही. हा 1200 सदनिका धारकांवर अन्याय झाला आहे. नियमाप्रमाणे म्हाडाने ती मोकळी जागा विकसित करुन पालिकेच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे म्हाडाच्या मोरवाडीतील प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये. म्हाडाकडून मोकळी जागा विकसित करुन घेतल्यानंतरच त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात यावा.
त्यामुळे गेली 20 वर्ष म्हाडामधील रहिवासी प्रत्येक आयुक्तांकडे, लोकप्रतिनिधींकडे आपली तक्रार करीत आहेत. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविला नाही. आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडे आपली तक्रार घेऊन गेले होते. मात्र या रिहवाश्यांचा प्रश्न कोणीही सोडविली नाही. त्यामुळे म्हाडाने लवकरात लवकर ही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.