म्हैसकर पुत्राच्या आत्महत्येने उडाली खळबळ

0

मुंबई – म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ मिलिंद म्हैसकर आणि नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने प्रशासन व राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ज्येष्ठ आयएएस अधिकारी असलेल्या म्हैसकर दांपत्याचा मुलगा मन्मथने मलबार हिलमधील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मलबार हिल पोलिसांनी चौकशीसाठी दोन मित्रांना ताब्यात घेतले असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
माहितीनुसार, 22 वर्षीय मन्मथ आपल्या मित्राला भेटायचे असल्याचे सांगून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास मन्मथने मलबार हिलमधील दरिया महल इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र मन्मथचा जागीच मृत्यू झाला होता. मलबार हिल पोलिसांनी पोस्टमॉर्टमकरिता मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवला. या घटनेत मलबार हिल पोलिसांनी चौकशीसाठी दोन मित्रांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. दुपारी १ वाजेच्या सुमारास मन्मथच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

मंत्रालय बुडाले शोकसागरात
मंत्रालयात आणि एकूणच प्रशासनात म्हैसकर दाम्पत्याने अनेक ठिकाणी महत्वाच्या पदावर काम केलेले आहे. त्यामुळे प्रत्येकच विभागाशी त्यांचा ऋणानुबंध जुळलेला आहे. प्रशासनातील कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या म्हैसकर दाम्पत्यांसाठी एकुलत्या एक मुलाचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे. सकाळी घटना घडल्यानंतर सोशल माध्यमांतून वाऱ्यासारखी पसरली. मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हैसकर कुटुंबियांना भेट देऊन सांत्वना दिली. दरम्यान मंत्रालयात देखील या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात होती. मनीषा म्हैसकर कार्यरत असलेल्या नगरविकास विभागासह दोघांनीही आधी काम केलेल्या ठिकाणी अधिकारी तसेच कर्मचारी या घटनेने सुन्न झाल्याचे चित्र दिसून आले.