म. गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख प्रथम नेताजींकडूनच ः रत्नाकर महाजन

0

पिंपरी चिंचवड ः नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महात्मा गांधींबरोबर टोकाचे मतभेद होते. सिंगापूर रेडिओवरुन त्यांनी प्रथम महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ (ऋरींहशी ेष परींळेप) म्हणून संबोधले. त्यावेळी जातीयवादी शक्तींनी म. गांधींना राष्ट्रपिता म्हणण्यास आक्षेप घेतला. तेच आता महात्मा गांधींना चष्मा आणि स्वच्छता या प्रतिकांमध्ये अडकवू पहात आहेत. असे झाले तर सत्याग्रह, समभाव, हिंदू – मुस्लिम ऐक्य या गांधींच्या विचारांवर आपोआप दुर्लक्ष होईल असा आरएसएसचा डाव आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केले.

म. गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निगडी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, युवा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जैयस्वाल तसेच शहाबुद्दीन शेख, सुंदर कांबळे, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, मेहताब इनामदार, दिलीप पांढरकर, बाबा बनसोडे, विशाल कसबे, शितल कोतवाल, आशा शहाणे, गौरव चौधरी, अक्षय राहरकर, भास्कर नारखेडे, हिरामण खवळे, आण्णा कसबे, विश्‍वनाथ खंडागळे, पांडूरंग जगताप, सुनिल राऊत, दिपक जाधव, दिलीप भालेकर, अविनाश पवार आदी उपस्थित होते. महाजन यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महाजन म्हणाले की, महात्मा गांधींचा स्वच्छतेचा खरा वारसा संत गाडगेबाबांनी पुढे चालविला. आताचे सरकार हा वारसा निव्वळ जाहिराती पुरते चालवित आहे. मागील वर्षांत या सरकारने सहा हजार कोटी रुपये स्वच्छतेच्या जाहिरातीवर खर्च केले. ‘मीच गांधी, मीच नेहरु आणि मीच पटेल’ असे नागरिकांच्या मनावर जाहिरातीतून बिंबवण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या सुरु आहे. संघावर पटेलांनी बंदी घातली. नेहरुंच्या इच्छेखातर संघावरची बंदी उठवली. देशभर लोखंड जमा करुन पटेलांचा पुतळा उभारला. आता त्याला गंज चढला आहे. त्याकडे बघायला त्यांना वेळ नाही. त्यांना फक्त त्याचा इव्हेंट करायचा होता. देवा धर्माच्या नावावर, लोकांच्या भावनेवर पैसा गोळा करायचा आणि त्याला राष्ट्रभक्तीचा मुलामा द्यायचा हाच उद्योग सध्या सुरु आहे. राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रीय स्वातंत्र्याचा यांचा काही संबंध नाही. हेगडेवार सोडून यांची एकही व्यक्ती अशी नाही ज्यांनी स्वातंत्र्यात भाग घेतला आणि त्यांना अटक झाली. हा इतिहास काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनते पर्यंत पोहचवावा असे आवाहन महाजन यांनी केले.

स्वागत, प्रास्ताविक करताना सचिन साठे म्हणाले की, महात्मा गांधींची विचारधारा असणारा देश म्हणून भारताला जगात ओळखले जाते. आज गांधींची तीच अहिंसेची, सत्याग्रहाची विचारधारा संपवण्याचे काम सरकार करीत आहे. महात्मा गांधींची हत्या ज्या धार्मिक, जातीयवादी विचारधारेतून झाली त्याच विचारांचा अंगिकार करणारे परदेशात जाऊन महात्मा गांधींचे महत्व जगाला सांगू लागले आहेत. महात्मा गांधी यांचे विचार त्यांना आचरणात आणायचे नसून, गांधी फक्त स्वत:ची प्रतिमा जाहिरातीतून उभी करण्यासाठी हवे आहेत. असे साठे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन मयुर जैयस्वाल, आभार गौरव चौधरी यांनी मानले.