शिरपूर । शिरपूर वरवाडे नगर परिषद संचलित इंदिरा गांधी मेमोरीअल हॉस्पीटलमध्ये दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सेवा देणारे नाशिक येथील अपोलो हॉस्पीटलचे किडनी विकार व किडनी प्रत्यार्पण तज्ज्ञ डॉ. मोहन पटेल यांची यंग सायंटिस्ट अवॉर्डसाठी निवड झाल्याने हॉस्पीटलमध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन तपनभाई पटेल यांनी देखील डॉ. मोहन पटेल यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले असून माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्या हस्ते हॉस्पीटलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
8 सप्टेंबर रोजी जिनिव्हा येथे होणार गौरव
पटेल परिवाराच्या प्रयत्नाने नगर परिषदेच्या इंदिरा गांधी हॉस्पीटलमध्ये अतिशय उत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातात. दर आठवडयाला अनेक तज्ज्ञ डॉक्टर्सला रुग्णांच्या सेवेसाठी नियमित बोलाविण्यात येते. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सेवा देणारे डॉ. मोहन पटेल यांनी अवयव दान- समज व गैरसमज या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रत्यारोपण परिषदेकडे शोध प्रबंध सादर केला होता. या परिषदेत सादर करण्यात आलेल्या शोध प्रबंधामुळे डॉ. मोहन पटेल यांची या वर्षाच्या यंग सायंटिस्ट अवॉर्डसाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार त्यांनी 8 सप्टेंबर रोजी स्वित्झरर्लँड जिनिव्हा येथे होणार्या आंतरराष्ट्रीय प्रत्यारोपण व अवयव दान परिषदेमध्ये देवून तेथे त्यांना गौरविण्यात येणार आहे. डॉ. पाटील हे डायलेसीस रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यांच्या सहयोगाने इंदिरा गांधी हॉस्पीटलमध्ये डायलेसीस विभाग सुरु झाला आहे.