नवी दिल्ली । नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतील निराशजनक कामगिरीबद्दल भाष्य करताना देशातील आघाडीची महिला पेहलवान विनेश फोगाट म्हणाली की, जागतिक स्पर्धेतील अपयशासाठी खेळाडूंच्या जोडीने देशातील शासकिय यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे आणि यंत्रणेने त्याची जबाबदारी स्विकारायला पाहिजे. ट्विटरवर केलेल्या पोस्टवर विनेश म्हणाली, खेळाडू अथक मेहनत करत आहेत. पण खेळांचे व्यवस्थापन जोपर्यत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत गुणवत्ता असूनही आम्हाला त्याला साजेशी कमागिरी करता येणार नाही. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यात मी सुधारणा करेल पण त्याचबरोबर शासकिय यत्रंणांनाही आपल्या चुका सुधाराव्या लागतिल. मागील आठवड्यात जे काही पॅरिसमध्ये झाले त्याची पुनरावृत्ती व्हायला नको, पण जे काही घडलय त्याची जबाबदारी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे.
यावेळी विनेशने भारतीय संघासाठी चांगल्या परदेशी प्रशिक्शकाची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले. विनेश म्हणाली की, भारतीय खेळाडूंसाठी चांगल्या परदेशी मार्गदर्शकाची गरज आहे. या विषयावर आधीही भरपूर लिहीण्यात आले आहे पण काहीच झालेले नाही. भारतीय पेहलवानांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुभवाची आवश्यकता आहे पण पुढील वर्षापर्यंत आम्ही देशातच सराव करणार आहोत. ऑलिम्पिक होऊन आता वर्ष झाले आहे. ऑलिम्पिक झाल्यावर देशांतर्गत क्रीडा व्यवस्थापनात बदल व्हायला पाहिजे असल्याची चर्चा झाली. पुढे काय झाले?.