यंत्रणेशिवाय कारी गावाला शुद्ध पाणी

0

भोर : भोर तालुक्याजवळील कारी गावापासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या नीरा नदीचे गढुळ पाणी ग्रामपंचायतीच्या वतीने गावाला पुरवले जायचे. त्यामुळे गावात साथीच्या आजारांचे प्रमाणही वाढत होते. यावर मात करण्यासाठी रायरेश्‍वर सामाजिक विकास संस्थेने गावातील गावकर्‍यांना पिण्यायोग्य शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा जणू वसाच उचला. आणि त्यांच्या या प्रयत्नातून कोणत्याही यंत्रणेशिवाय गावाला तब्बल सहा महिने ताजे स्वच्छ निर्मळ पिण्याचे पाणी मिळत आहे. गावकर्‍यांसाठी हा चमत्कारच ठरला असून ‘शुद्धा गंगा आली अंगणी’ अशा काहीशा प्रतिक्रिया गावकर्‍यांमध्ये उमटल्या आहेत.

या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे येथील झरे, नद्या, पाण्याने खळखळून वाहत असतात. नदीला जाणारे हे स्वच्छ, शुद्ध पाणी भोर तालुक्यातील कारीच्या गावकर्‍यांना पुरवण्यासाठी रायरेश्वर सामाजिक विकास संस्था प्रयत्न करत आहेत. कारी हे गाव भोरपासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. रायरेश्वर तेथून जवळ असलेल्या डोंगरावरील जिंवत झर्‍यावर बांध घातले. हे अडवलेले शुद्ध पाणी दोन किलोमीटर दोन इंचाच्या प्लॅस्टिक पाईपमधून गावाच्या पाण्याच्या टाकीत सोडले. त्यामुळे गावकर्‍यांना पावसाळ्यात शुध्द पाणी मिळाले.

पूर्वी गावापासून चार किलोमीटरवर असलेल्या निरा नदीचे गढुळ पाणी ग्रामपंचायतीच्यावतीने पुरवले जायचे. त्यामुळे गावात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत होते. परंतु आता या स्वच्छ, शुध्द पाण्यामुळे गावकर्‍यांच्या आरोग्याचे प्रश्नही सुटले आहेत. या पाण्याची तपासणी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील लॅबमध्ये करण्यात आली. त्याचा रिपोर्टही सकारात्मक आल्याने या उपक्रमाचे गावकर्‍यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे वीजे शिवाय आणि कोणत्याही यंत्रने शिवाय हे पाणी गावातल्या टाकित सोडले जाते यामुळे ग्रामपंचायतीचा वीज बिलाचा खर्च देखील वाचला आहे. गावाची लोकसंख्या साधारन साडेतीन हजार इतकी आहे. गावाला दिवसाला अंदाजे एक लाख लीटर पानी लागते त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातुन गावाचा पानी प्रश्न देखील सुटला आहे. भविष्यात याच झर्‍याच्या ठिकाणी विहीर खोदण्याचा संस्थेचा मानस आहे. जेणेकरुन बारा महिने गावकर्‍यांना शुध्द पाणी मिळेल, असे रायरेश्वर सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सुरेश पावसकर यांनी सांगितले.

अशी आहे रचना
डोंगरावर वाहता झरा आहे. तिथुन ते गावातील पाण्याची टाकी हे अंतर जवळपास 2 किलोमीटर एवढे आहे. तो झरा आडवून तिथुन ते टाकीपर्यंत 2 इंच ची पाईपलाइन करून ते पाणी टाकीत सोडले जाते. नंतर टाकीतुन गावातील प्रत्येक घराला ते पाणी रोज पुरवले जाते.