मुंबई : येणारा २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, या वर्षी राज्यशासनातर्फे गेट वे ऑफ इंडियावरील भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही यावेळी सादर होणार असून विविध साहित्य-प्रकारांसाठीचे ३३ राज्य वाड्.मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली.
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मारूती चितमपल्ली यांना, श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार यास्मीन शेख यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्याम जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ११ पुस्तकांचे प्रकाशन होत असून विश्वकोश मंडळाच्या वतीने ‘पेनड्राईव्हमधील विश्वकोशाचे’ लोकार्पण करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
संगणकाच्या विविध कार्यकारी प्रणालींमध्ये (Operating Systems) मराठी युनिकोड कसे कार्यान्वित करायचे, याची माहिती देणारी चित्रफित तयार करण्यात आली आहे. ही चित्रफित सर्व समाजप्रसारमाध्यमांतून विनामूल्य प्रसारित करण्यात येणार आहे. यंदा मराठी भाषा दिन राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा व ग्रंथालये अशा सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. विकिपीडियावर लेखन व युनिकोडातून मराठी अशा दोन महत्त्वाच्या उपक्रमांसह व्याख्याने, परिसंवाद, स्पर्धा असे विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. राज्यातील ११ विद्यापीठांच्या माध्यमातून, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक आणि जळगाव या ठिकाणी मराठी भाषेच्या गौरवार्थ सुमारे ४५० कलाकार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत, असेही तावडे यांनी सांगितले.