उस्मानाबाद: यंदाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली. जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन पार पडणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतले जावे अशी मागणी होत होती.
१६ जुलै रोजी उस्मानाबाद शहर आणि परिसरातल्या विविध संस्था, संघटनाच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय या ठिकाणी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय साहित्यसंमेलन व्हावे यासाठी मराठवाड्याच्या साहित्य परिषदेच्या शाखेने गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. ९३ व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली. मात्र त्यामध्ये उस्मानाबादचे पारडे जड ठरले आणि हे साहित्य संमेलन घेण्याचा मान उस्मानाबादला मिळाला आहे.