यंदाही पवनाथडी वादाची!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने भरविण्यात येणारी पवनाथडी जत्रा आणि वाद हे आता समीकरणच बनले आहे. जत्रा भरविण्याच्या ठिकाणावरुन गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हमखास वाद होत आहेत. यंदा तर जत्रा स्थगित करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली होती. त्यानंतर खर्च कमी करुन जत्रा घेण्याचे निश्‍चित झाले. त्यावरुन सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खालच्या स्तराची टीका झाली. शुक्रवारी जत्रेतील नागरिकांच्या स्वागताच्या फलकांवरुन राष्ट्रवादी आणि प्रशासनामध्ये वादावादी झाली. यामुळे वादाची पवनाथडी जत्रा अशी जत्रेची ओळख निर्माण होऊ लागली आहे.

आयोजनाचे अकरावे वर्ष
पुण्यात भीमथडी जत्रा भरविली जाते. भीमथडीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे दहा वर्षापूर्वी पासून पवनाथडी जत्रे भरविण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 11 वर्ष आहे.

दोन-तीन वर्षांपासून वाद
पवनाथडी जत्रा भरविण्याच्या टिकाणीवरुन गेल्या तीन ते तीन वर्षांपासून वाद होते. गेल्यावर्षी पवनाथडी जत्रा सांगवीला घ्यायची कि भोसरीला यावरुन तत्कालीन सत्ताधार्‍यांमध्ये मतभेद झाले होते. यंदा तर पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी पालिकेने ‘लकी ड्रॉ’ काढले त्याच दिवशी पवनाथडी जत्रेतून महिला बचत गटांना यथावकाश फायदा होताना दिसून येत नाही. त्यामुळे पवनाथडी जत्रा स्थगित करण्याची मागणी केलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र पालिका प्रशानाला मिळाले. तसेच पवनाथडी जत्रेसाठी महापालिकेने 80 लाख रुपयांची बजेटमध्ये तरतूद केली असून कदाचित यापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.

आमदारांचे पत्र
मागील काळातील अनुभव पाहता या उपक्रमातून बचतगटांना विशेष कार्य साध्य होईल अशी स्थिती दिसून येत नसून महिला बचत गटांना याचा यथावकाश फायदा होताना दिसत नाही. तसेच या उपक्रमातील खर्च निरर्थक होणार आहे, असेही जगताप यांनी पत्रात म्हटले होते. त्यामुळे पवनाथडी जत्रेबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली होती. परंतु, पालिकेतील पदाधिकार्‍यांनी आपल्या नेत्याला 45 लाखाच्या आता पवनाथडी जत्रा पार पाडण्याचे आश्‍वासन दिले आणि जत्रा घेण्याचे निश्‍चित झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
जत्रेतील खर्च कमी करण्याचा कांगावा हा भ्रष्टाचार लपविण्यासाठी केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या. त्यानंतर शुक्रवारी (दि.5) पवनाथडी जत्रेत येणा-या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकांवरून सांगवीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. यामध्ये संपुर्ण प्रशासनाची चूक आहे. विरोधीपक्षाचे फलक अनधिकृत असल्याचे सांगत प्रशासनाने काढले तर सत्ताधा-यांचे फलक ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि सत्ताधा-यांनी लावलेल्या फलकांची परवानगी प्रशासनाला मागितली. त्यावरुन प्रशासनाचे त..त..म..म.. झाले. नाईलाजास्त प्रशासनाने सत्ताधा-यांचे आणि पालिकेचीही अनधिकृत फलक हटविले.

उद्देश होत नाही सफल
महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जात आहे. परंतु, तो उद्देश सफल होताना दिसून येत नाही. नगरसेवक, पदाधिका-यांशी संबंध असलेल्या महिला बचत गटांनाच जत्रेतील स्टॉल प्राधान्याने मिळातात, हे वास्तव आहे. पवनाथडी जत्रा केवळ वादामुळेच चर्चेत राहिली जात आहे. यंदा भाजपच्या शहराध्यक्षांनी जत्रा स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुढील वर्ष जत्रा होती की नाही याबाबत साशंकता आहे.