नवी दिल्ली – दरवर्षी ऐनवेळी मिळते तशी मुदतवाढ मिळते म्हणून इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यात चाल-ढकल करणाऱ्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सीबीडीटीने शनिवारी धक्का दिला आहे. आयटीआर भरण्यास कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचे व तसा प्रस्तावही नसल्याचे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे. 31 जुलै हीच आयटीआर भरण्याची अंतिम मुदत असून करदात्यांनी कर नियम व प्रक्रियांचे पालन करावे, असा सल्लाही देण्यात आळा आहे.
जुलैच्या सुरूवातीलाच अर्थमंत्री अरूण जेटली यांनी करदात्यांसाठी आयकर सेतू नावाचे मोबाईल अॅप लाँच केले होते. कोणत्याही बाह्यमदतीशिवाय या अॅपच्या सहाय्याने करदात्याच्या सर्व शंकांचे निरसन होते. सीबीडीटीने इतकी चांगली सुविधा करदात्यांना उपलब्ध करू दिली होती, याची आठवणही करून दिली आहे.
एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाला. काही व्यापारी संघटना आणि सनदी लेखापाल (सीए) जीएसटीमुळे गोंधळलेले आहेत. त्यामुळे आयकर परतावा विवरण सादर करू शकलेले नाहीत, अशी कारणे देऊन 31 जुलैपुढे मुदतवाढ मागितली जात होती. सीबीडीटीने आयकर परतावा (आयटीआर) सादर करण्यासाठी अशी मुदत न वाढविल्याने आता त्यासाठी केवळ दोन दिवसच उरले आहेत.
कसा सादर कराल त्वरीत इनकम टॅक्स रिटर्न
आपली परताव्याची रक्कम त्वरीत मिळावी म्हणून आपण ऑनलाईन रिटर्न फाईल करा.
आयटीआर ऑनलाईन भरल्यानंतर व्हेरीफाय करा. त्यासाठी आधार नंबर, इंटरनेट बँकिंग, डिजिटल सिग्नेचर आणि ओटीपीचे पर्याय वापरता येतात.
इनकम टॅक्स रिटर्न दाखल करताना बँक अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड नीट तपासून सादर करा.
फॉर्म २६ एएस नक्की पहा कारण कापलेल्या टीडीएसची माहिती तुम्हाला मिळेल.
नोकरी करणाऱ्यांनी इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन युटिलिटीने रिटर्न भरा किंवा इनकम टॅक्स अकाउंटला लॉग इन करून आयटीआर 1 किंवा आयटीआर 4 फॉर्म भरा