यंदा गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ

0

तळेगाव दाभाडे : सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने हवेत गारवा आलेला आहे. त्यामुळे स्थानिक मूर्तिकारांना गणपती उत्सवासाठी बनविलेल्या मूर्ती सुकविण्यासाठी कृत्रिम उष्णतेसाठी विजेचा हिटर आणि शेकोट्या तयार कराव्या लागत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून त्याचा प्रभाव मूर्तींच्या किमतींवर होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कृत्रिम शेकाट्यांचा वापर
सध्या मान्सूनचा पाऊस गेली 3 आठवडे सतत पडत आहे. या पावसामुळे हवेत खूपच गारवा आलेला आहे. पुढील महिन्यात येत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्थानिक कलाकार अहोरात्र गणरायाच्या मूर्ती घडविण्यासाठी आटापिटा करत आहे. मात्र हवेतील प्रचंड गारव्यामुळे या मूर्ती सुकविण्यासाठी कृत्रिम गरम वातावरण तयार करावे लागत असल्याचे मूर्तिकार विठ्ठल दरेकर यांनी सांगितले. गणरायाच्या मूर्ती तयार करण्यासाठी मावळातील गावोगावचे स्थानिक मूर्तिकार विशेष वेळ काढून मूर्ती बनवीत आहेत. वेळेत मूर्ती पूर्ण होण्यासाठी आणि त्यावर आकर्षक रंगकाम होण्यासाठी मूर्ती लवकरात लवकर वाळणे आवश्यक आहे. अशा मूर्ती वाळविण्यासाठी मुर्तीकाराकडून विजेचे हिटर तसेच लाकडाच्या कृत्रिम शेकोट्याच्या माध्यमातून मूर्ती सुकविल्या जात आहेत. त्यामुळे खर्चात खुप वाढ होत असल्याने मूर्तीचे दर वाढण्याची भीती मुर्तीकाराकडून व्यक्त होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. सध्या तळेगाव शहरात 8 ते 10 स्थानिक कलाकार आपआपल्या कारखान्यामध्ये मूर्ती बनवीत असून पावसामुळे अडचणीमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक कलाकर चिंताग्रस्त झालेले आहेत.