खडकवासला धरणसाखळीत 62 टक्के पाणीसाठा; जलसंपदा पुढील सात महिन्यांचे नियोजन करावे लागणार
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला प्रकल्पात 62.63 टक्के म्हणजे 18.26 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे. पाणीसाठा कमी असूनही पुणे महापालिकेकडून सध्या 1350 एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, पालिकेने दररोज एवढेच पाणी वापरले तर 15 जुलैपर्यंत धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही. परिणामी पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. खडकवासला धरण प्रकल्पात सोमवारी (दि.24) केवळ 18.26 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासनातील वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. पालिकेने 1350 एमएलडी पाणी वापरले तर शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे पालिकेने 1150 एमएलडीपाणी वापरावे, अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे. परंतु, त्यावर कोणताही निर्णय होत नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच गेल्या आठ वर्षाचा विचार करता 2015 वगळता खडकवासला धरण प्रकल्पात सर्वात कमी पाणीसाठा आहे.
जलसंपदा विभागातर्फे 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. त्यातही 15 जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवावा लागतो. त्यामुळे 15 जुलैनंतरही धरणात 2 ते 2.5 टीएमसी पाणीसाठी असणे आवश्यक आहे. परंतु, पिण्यासाठी लागणारे पाणी, कृषीसाठी सोडले जाणारी पाणी आणि बाष्पीभवनामुळे कमी होणारा धरणातील पाणीसाठा याचा विचार केला. तर सद्यस्थितीत धरणातील पाणी कमी पडत आहे. एका वर्षापूर्वी धरण प्रकल्पात 24 डिसेंबर 2015 रोजी 12.88 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, त्यावेळी पालिकेकडून दरडोई 303 एलपीसीडी पाण्याचा वापर केला जात आहे. परंतु, 2018मध्ये दरडोई 356 एलपीसीडी पाणी वापरले जात आहे. तसेच 24 डिसेंबर 2011 रोजी सुद्धा धरणात केवळ 19.72 टीएमसी एवढाचा पाणीसाठा होता. त्यावेळीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात आला होता. परंतु, सद्यस्थितीत पाणी वापराबाबत कोणतीही काटकसर केली जात नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अडचण येत आहे.
खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला प्रकल्पात 62.63 टक्के म्हणजे 18.26 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे. खडकवासला धरणात 1.16 टीएमसी, पानशेतमध्ये 7.28 टीएमसी, टेमघर धरणात 0.13 टीएमसी आणि वरसगाव धरणात 9.69 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
एक टीएमसी पाणी कमी वापरले तरच
पाटबंधारे विभागाला दुसरे रब्बीचे आवर्तन आणि उन्हाळी आवर्तन असे एकूण सुमारे 7.5 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.तसेच पालिकेकडून सध्या वापरल्या जात असलेल्या पाण्याचा विचार करता पिण्यासाठी तब्बल 9.50 ते 10 टीएमसी पाणी द्यावे लागेल.त्याचप्रमाणे सुमारे 2 ते 2.5 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे.त्यातच सर्व पाणी संपणार आहे. मात्र, शेतकर्यांनी व पालिकेने प्रत्येकी एक टीएमसी पाणी कमी वापरले तरच 15 जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.