स्कायमेटपाठोपाठ हवामान खात्याचाही शेतकर्यांना दिलासा
सरासरी 97 टक्के पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज
नवी दिल्ली : स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने नैऋत्य मोसमी पावसाचा सकारात्मक अंदाज वर्तविल्यानंतर भारतीय हवामान खात्यानेदेखील शेतकरीवर्गासह सर्वांना दिलासा देत चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. 2018 मध्ये सरासरीच्या तुलनेत 97 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या अंदाजात फार फार तर पाच टक्क्यांचा कमीअधिक फरक होऊ शकतो, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले. हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हवामानविषयक पहिलाच अंदाज वर्तविला. त्यांच्या अंदाजानुसार, सामान्य पावसाची शक्यता 56 टक्के तर दुष्काळी परिस्थितीचा अंदाज 44 टक्के आहे. अल निनोची शक्यता पाहाता, सविस्तर अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्तविला जाईल, असेही रमेश यांनी सांगितले. मोसमी पाऊस चांगला होणार असल्याचे संकेत मिळाल्याने सत्ताधारी भाजपला चांगलाच दिलासा मिळाला असून, 2019च्या निवडणुकांना सामोरे जाताना देशातील दुष्काळी व आर्थिक चणचणीचे वातावरण निवळलेले असेल, असे संकेत मिळत आहेत.
ठळक मुद्दे
1. यावर्षी दुष्काळी परिस्थितीची अजिबात शक्यता नाही.
2. सरासरी 96 ते 104 टक्के पावसाची शक्यता
3. स्कायमेटच्या अंदाजानुसार 100 टक्के पाऊस
4. जून-जुलैमध्ये पावसास सुरुवात, ऑगस्टमध्ये थोडा ब्रेक
5. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत 99 टक्के सरासरी गाठणार
यापुढील अंदाज मे महिन्यात!
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. या पावसाविषयीचा प्राथमिक अंदाज दरवर्षी एप्रिलमध्ये भारतीय हवामान खात्याकडून जाहीर होत असतो. त्यानुसार, या खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी वर्तविलेल्या पहिलाच अंदाज दिलासादायक आहे. गेल्या 50 वर्षाच्या नोंदीनुसार, पावसाची सरासरी काढली जात असून, यंदा 97 टक्के पावसाचा वर्तविलेला अंदाज म्हणजे चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत आहेत. मोसमी पाऊस मे महिन्याच्याअखेर देशात दाखल होईल, आणि सप्टेंबरपर्यंत चांगली हजेरी देईल, असे शुभसंकेतही हवामानखात्याने वर्तविलेले आहेत. यापुढील दुसर्या टप्प्यातील अंदाज मे महिन्यात तर पावसाला सुरुवात झाल्यानंतर जूनमध्ये अंतिम स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तविला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
वर्ष स्कायमेटचा अंदाज हवामान खात्याचा अंदाज प्रत्यक्षात झालेला पाऊस
2018 100 97 —
2017 95 96 95
2016 105 106 97
2015 102 93 86