यंदा पाऊस मुबलक!

0

पुणे । मान्सूनची वाटचाल चांगल्या प्रकारे सुरू असल्याने पुण्यासह संपूर्ण राज्यात या वर्षी 102 टक्के सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. येत्या 2, 3 आणि 4 जूनला राज्यभरात सर्वत्र चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. कमी दिवसात जास्त पाऊस पडणार आहे. मात्र काही काळ पावसाचा खंडही असू शकतो, असेही ते म्हणाले.

यावर्षी मान्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. वार्‍याचा वेग कमी राहणार असल्याने जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडेल. विदर्भ व मराठवाड्यात पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे. 30 जून ते 7 जुलै पर्यंत हा खंड पडणार आहे. असे असले तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असेही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुण्यात 594 मि. मि. पाऊस
पुणे जिल्हात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची सरासरी 566 मि.मी. असते. मात्र, यावर्षी 594 मि. मि. पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी पुणे परिसरात धरणे पूर्णपणे भरून खालील पट्ट्याला त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

शेतीला फायदा

यंदा पाऊस चांगला होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पिक चांगले येईल. 2 ते 4 जून दरम्यान चांगला पाऊस होणार असून खरीप पेरण्यांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल. पेरण्या लवकर झाल्या तर चांगले उत्पादन होईल, असेही साबळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर 2017 मध्ये सरासरीच्या 102 टक्के पाऊस

1) पश्चिम विदर्भ विभाग – सरासरी 100 %

2) मध्य विदर्भ विभाग – सरासरी 102 %

3) पूर्व विदर्भ विभाग – सरासरी 104 %

4) मराठवाडा विभाग – सरासरी 100 %

5) कोकण विभाग – सरासरी 102 %

6) उत्तर महाराष्ट्र – सरासरी 103 %

7) पश्चिम महाराष्ट्र – सरासरी 102 %

दुष्काळी जिल्ह्यांची संख्या वाढली
1972 साली तालुके 84 व 10 जिल्हे दुष्काळग्रस्त होते. 2003 साली तालुके 102 व जिल्हेे 12 झाले. 2012 साली तालुके 123 व जिल्हे 18 तर 2015 मध्ये तालुके 136 व जिल्हेे 28 झाले. अशा प्रकारे दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढत असल्याचे मत साबळे यांनी व्यक्त केले.