पुणे: कला-संस्कृती, गायन वादन, नृत्य क्रीडा यांचा संगम असणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे 14 सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार असून या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमामालिनी उपस्थिती असणार आहेत. यंदाचे फेस्टिव्हलचे तिसावे वर्ष असून यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे.
यामध्ये पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉइस ऑफ पुणे ‘फेस्टिव्हलच्या विशेष स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे पुण्यातील शताब्दी साजरी करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येतो. यंदा साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदीर गणेशोत्सव मंडळ यांचा विशेष गौरव यंदा करण्यात येणार आहे. तर यंदाचा पुणे फेस्टिव्हल पुरस्कार बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील तसेच सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ,ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, बीव्हीजी प्रायव्हेट लिमिटेडचे हनुमंत गायकवाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम गणेश कला क्रीडा ,बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार असून पुणेकरांना याचा भरभरून आस्वाद घेता येणार आहे. या उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंदिर सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. या फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी असून मुख्य संयोजक म्हणून कृष्णकांत कुदळे काम पाहत आहेत.