पुणे : यंदाच्या गणेशोत्सवासाठी ऑनलाइन पद्धतीनेही परवानगी देणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी गणेश मंडळांच्या सोबत झालेल्या बैठकीत मान्य केले. त्यामुळे महापालिकेच्या एक खिडकी अर्थात ऑफलाइन पद्धतीसह यंदापासून ऑनलाइनही नोंदणी करता येणार आहे. गणेशोत्सव 125 वा की 126वा यावरूनही वाद रंगलेला बघायला मिळाला.
या बैठकीस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वाहतूक आयुक्त अशोक मोराळे, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, शीतल उगले यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यंदा प्रथमच महापालिका गणेशोत्सवासाठी वेबसाईट सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीला भाऊ रंगारी मंडळाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी हा कोणताही जातीवादाचा प्रश्न नसून सन्मानाचा असल्याचे सांगितले. ज्यांनी हा उत्सव सुरू केला त्याला सन्मान मिळत नसेल तर पालिकेने 2 काय 10 कोटी खर्च केला तरी उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर या विषयावर महापौर आपल्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
मागील वर्षीची बक्षिसे वाटलीच नाहीत !
2016साली साजरा झालेल्या उत्सवाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. यावर कार्यकर्त्यांनी 2015साली झालेल्या उत्सवाचाही बक्षीस वितरण सभारंभ बाकी असल्याचे सांगितले. त्यावर माहिती घेऊन तेही वितरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.