यमुनानगर पोलीस चौकीतील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी
पिंपरी-चिंचवड : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने यमुनानगर, निगडी प्रभागात ठिकठिकाणी 23 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या सर्व कॅमेर्यांचे चित्रीकरण यमुनानगर पोलीस चौकी व निगडी पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षाकडून केले जाते. प्रत्येक मुख्य चौकात असे चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी नुकतीच स्थानिक नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी केली. त्यांनी परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
अनुचित प्रकार रोखता येतील
निगडी प्रभागात घडणार्या घटना यमुनानगर पोलीस चौकी व निगडी पोलीस ठाणे येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पोलीस प्रशासनाला कळतात. त्यामुळे पुढील कारवाई व उपाययोजना करण्यासाठी त्वरित हालचाली करता येतात. प्रभागातील सर्व भाग सीसीटीव्ही कॅमेर्याच्या कक्षेत आल्यास बर्याच अनुचित घटना रोखता येऊ शकतात, असे मत यावेळी केंदळे यांनी व्यक्त केले. सुरक्षेच्या दृष्टीने प्रभागात अजूनही बर्याचशा सुधारणा करण्याची गरज आहे. प्रत्येक भागातील मुख्य चौक, अतिसंवेदनशील भाग, शाळा व महाविद्यालये, भाजीमंडई, दवाखाने, उद्याने, बँक, धार्मिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे, अशा सूचना त्यांनी केल्या.