यवत । गराडेवस्ती येथे नव्याने होत असलेल्या बिअरबारला महिलांनी तीव्र विरोध केल्याने हे दारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी दौंड उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक राजन साळोखे यांनी यवत येथील ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित महिलांकडून या दारूच्या दुकानास विरोध करणारे पत्र घेतले आहे. हे पत्र पुणे विभागाचे उत्पादन शुल्क निरीक्षक यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविणार असल्याचे साळोखे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कांचन दोरगे, मंगल खेडेकर, आशा यादव, सविता पवार, सुरेखा जाधव, शोभा हिंगणे, पार्वती कोळी, सुरेखा गराडे, मयुरी गांधी या महिला उपस्थित होत्या.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने 1 एप्रिल 2017 पासून राज्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गापासून 500 मीटरच्या आतील मद्य विक्री करणारी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दारूची दुकाने हद्दपार झाली आहेत. परंतु दौंड तालुक्यातील यवत येथील यवत-लडकतवाडी रस्त्यावर गराडेवस्ती येथे वाईन शॉप, बिअर बार, मद्य विक्री व्यवसाय सुरू होत असल्याने गराडेवस्ती, जाधववस्ती, सहकारनगर, संतनगर, खैरवस्ती, चोभेमळा येथील 2500 ते 3000 लोकसंख्या असलेल्या वस्तीतील महिला आक्रमक झाल्या आहेत. या महिलांनी यापूर्वी 31 जुलै रोजी यवत पोलीस ठाण्यात जाऊन गराडेवस्ती परिसरात मद्याचे दुकान सुरू न होण्याबाबत लेखी स्वरुपाचे निवेदन दिले होते. तर मंगळवारी या दारुच्या दुकानाच्या विरोधासाठी भजन आंदोलन करीत आपला विरोध असल्याचे दाखवून दिले होते. या महिलांनी यापूर्वीही 23 मे रोजी याच मागणीसाठी पोलीस निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग दौंड, तहसीलदार दौंड, यवत पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत यवत यांना लेखी निवेदन दिले आहेत. महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने यवत येथे होत असलेले बिअरबार दुकान हद्दपार करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे. यावेळी यवतच्या सरपंच रझिया तांबोळी, उपसरपंच समीर दोरगे, उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एम. नीळ, इब्राहम तांबोळी, व्ही. जी. विंचूरकर यासह आदी यावेळी उपस्थित होते.
या महिलांचा गराडेवस्ती परिसरात या दुकानास विरोध आहे. या परिसरात गणपती मंदिर असून मंदिरात दररोज धार्मिक कार्यक्रमासाठी लहान मुले व महिला उपस्थित असतात. तसेच या रस्त्यावरून मुला-मुलींचा शाळेत ये-जा करण्याचा मार्ग आहे. तसेच या मार्गावर आठवडे बाजारादिवशी महिलांची वर्दळ असते. अशा मद्य विक्री व्यवसायामुळे येथे अनधिकृत व्यवसायास चालना मिळेल. त्यामुळे महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. मद्य विक्री व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा व्यवसायास परवानगी न देता तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी यापूर्वीच दिला होता.