यवतमधील पालखी तळाची अतिरीक्त आयुक्तांकडून पाहणी

0

यवत । पुणे-पंढरपूर, देहू, आळंदी तिर्थस्थळ विकास आराखडा 2010 अंतर्गत जग्तगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील सर्व पालखी मुक्काच्या ठिकाणांचा आणि गोल रिंगण होणार्‍या गावांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पालखी स्थळाच्या गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अतिरिक्त आयुक्त जयंत पिंपळगावकर यांनी दौंड तालुक्यातील यवत येथील पालखी स्थळाच्या मुक्कामी गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पिंपळगावकर यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करत संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त सुनील मोरे, जालिंदर मोरे, विठ्ठल मोरे, नितीन मोरे, दिलीप मोरे, दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी संजय आसवले, दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, कुंडलीक खुटवड, यवतच्या सरपंच रजिया तांबोळी, नाथदेव दोरगे, नानासाहेब दोरगे, सदानंद दोरगे, सुभाष दोरगे, इब्राम तांबोळी ग्राम विकास अधिकारी सयाजी क्षीरसागर, महामार्गाचे वसंत पंदरकर, मंडलाधिकारी विनोद धांडोरे, तलाठी रविंद्र होले यांचेसह विद्युत, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्यासह आदी अधिकारी वर्ग व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

2 कोटींची विकास कामे
विकास आराखड्यानुसार प्रत्येक मुक्काम स्थळाला 2 कोटी तर गोल रिंगण असणार्‍या ठिकाणी 50 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये मेघडंबरी बांधणे, सार्वजनिक स्वच्छतागृह, स्नानगृह, पाणी पुरवठा टाकीचे बांधकाम करणे, सभागृह बांधणे, देखरेखीसाठी वॉच टॉवर उभारणे, रस्त्याचे मजबूतीकरण, कमान उभारणे, पालखी स्थळाच्या जागेला कंपाऊंड टाकणे तसेच पालखी सोहळा मार्गावरून जात असताना मुक्कामाच्या अनुषंगाने येणार्‍या अडचणी तसेच पालखी मार्गावरून जात असतना किंवा मुक्कामी जमिनीची कमतरता भासत असलेल्या ठिकाणच्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. संतांच्या आषाढी पालखी सोहळा मार्गावरील 30 मुक्कामांची ठिकाणे, 9 रिंगण ठिकाणांसाठी प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. हे नियोजित काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.