भुसावळ- यवतमाळ रेल्वे स्थानकाच्या तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडत तब्बल तीन लाख 61 हजारांची रोकड लंपास झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी रेल्वेतील लिपिक असलेल्या महिला कर्मचार्याचा पती योगेश रमेश पतेल यास अटक करण्यात आली आहे. मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा बलाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आल्याचे भुसावळ विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे यांनी सांगितले.
आरक्षणाची रक्कम लांबवली
यवतमाळ रेल्वे स्थानकाच्या आरक्षित तिकीट खिडकीवर 18 आणि 19 फेब्रुवारी झालेल्या आरक्षणाची रक्कम तीन लाख 61 हजार 325 रुपये रेल्वे स्थानकावरील तिजोरीत ठेवण्यात आल्याची संधी चोरट्यांनी साधत रेल्वे स्थानकाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत आतमधील काच फोडून तिजोरीतील रक्कम लांबवण्यात आली होती. भुसावळ रेल्वे स्थानकाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, मूर्तिजापूरचे अधिकार्यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. दरम्यान, या प्रकरणी रेल्वेतील लिपिक असलेल्या महिला कर्मचार्याचा पती योगेश रमेश पतेल यास संशयावरून अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.