यवतमाळमध्ये भाजपा-सेनेची मुसंडी

0

यवतमाळ । जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथवत शिवसेना व भाजपने मुंसडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 61 जागांपैकी शिवसेनेने 20 जागा मिळविल्या असून त्याखालोखाल भाजपने 18 जागा जिंकल्या आहेत. 2012 साली सेनेला 13 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या 4 जागा होत्या. यावेळी काँग्रेसला 11 तर राष्ट्रवादी-काँग्रेसला देखील 11 जागा मिळाल्या.एका जागी अपक्ष उमेदवार निवडून आला.

माजी मंत्री नाईकांच्या पुत्राचा पराभव
शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपला गढ मजबूत करत नेर दारव्हा दिग्रसमधील सर्व 11 जागा जिंकल्या. त्यांचे बंधू विजय राठोड यांनीदेखील विजय प्राप्त केला. जिल्हा परिषदेतील विद्यमान सभापतींना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत सर्वाधिक हादरा बसला तो माजी मंत्री मनोहर नाईक यांना. त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांना त्यांचेच पुतणे भाजपचे अमेय नाईक यांनी पराभूत केले. जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा राष्ट्रवादीच्या आरती फुफाटे यांनादेखील पराभव पत्करावा लागला. शिवाजीराव मोघे यांची सून काँग्रेसच्या किरण मोघे यांनी त्यांचा पराभव केला. निवडणूक निकालात निवडणूक निकालात मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नसल्याने सर्वाधिक उमेदवार निवडून आलेला पक्ष म्हणून शिवसेना आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी पैकी कोणाशी हात मिळवेल करेल याकडे यवतमाळ वासियांचे लक्ष लागले
आहे.