यवतमाळ- यवतमाळच्या आर्णीमध्ये आज भरदिवसा एका भाजपा कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
निलेश मस्के असे हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आर्णी येथे ही घटना घडली. पैशाच्या वादातून ही घटना घडल्याचे सुत्रांकडून कळते. भर दुपारी तीन जणांनी निलेशला भर रस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली. काठी सदृश्य हत्याराने त्यांनी त्याला मरेपर्यंत मारहाण केली. तसेच त्याला वाचवायला गेलेल्या त्याच्या मित्रालाही त्यांनी भोसकलं यात तो ही गंभीर जखमी झाला आहे.
चार महिन्यांपूर्वीच निलेशने भाजपामध्ये प्रवेश केला होता. तो चांगला मनमिळावू कार्यकर्त्या असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. दरम्यान, पोलिसांनी या तिनही हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.