यशवंतनगरीतून राजकारणाची नवी नांदी

0

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त 25 नोव्हेंबर रोजी कराड येथे यशवंतप्रेमीसह अनेक पक्षांचे प्रमुख नेते कराडनगरीत दाखल झाले होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाच्या प्रचार व राजकीय विचारांना जनतेपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे आणि या नव्या राजकीय चळवळीच्या शुभारंभाचा केंद्रबिंदू ठरला आहे ‘यशवंतनगरी’. स्व. चव्हाण साहेबांनी आपल्या राजकीय, सामाजिक कामांनी महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वास संपादन केला होता. आत्ताचा काळ काहीसा बदलला आहे. राज्य सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मेळ नाही, जनतेचा विकास यामध्ये बाजूलाच राहिला असल्याचे दिसत आहे. राजकीय साठमारीत हा 39;विकास’ कुठे हरवला, याचा शोध स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन व कर्मभूमीतून म्हणजेच कराड नगरीतून सर्व पक्षांनी सुरू केला आहे.

यशवंत स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्व. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र शरद पवार, शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे आदी मान्यवरांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन रॅलीला संबोधित करताना म्हटले आहे की, “पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला आकार देण्याचे काम स्व. यशवंतराव चव्हाणांनी केले. ‘फडणवीस यांची चव्हाणसाहेबांच्या विचारांजवळ जाण्याची क्षमता नाही. युती सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी केल्याचे आत्तापर्यंत दोनवेळा सांगून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे.’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त हल्लाबोल मोर्चाची राज्यभर सुरुवात केली आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच या पक्षाच्या मोर्चाला नागरिकांची उपस्थिती मोजकीच होती, याची गंभीर दखल पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी. कारण याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेला व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला लक्षणीय गर्दी होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍याच यशवंतनगरीत हे चित्र गेल्या तीन वर्षांत बदलल्याचेही दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांची सभा व शेतकरी मेळावा कालच रविवारी मोठ्या प्रमाणात झाला. शिवसेनेचा भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवरील राग अजूनही कमी झाला नसल्याचे उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे जाणवले आहे. शेतकर्‍यांचचे प्रश्‍न सोडवण्यास भाजपचे राज्य सरकार कमी पडत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली आहे. शिवसेनेने सत्तेत राहून भाजपची कोंडी करण्याचा एकमेव नामी उपाय शोधून काढला आहे.

काही जण म्हणतात की, भाजपचे सत्ताधोरण मान्य नसेल तर शिवसेना बाहेर पडण्याचा पर्याय का स्वीकारत नाही? परंतु हा शिवसेनेच्या राजकारणातील एक भाग असावा, असे वाटते. महाराष्ट्रातील विविध पक्ष आता विकासाची भाषा बोलू लागले आहेत, याचा अर्थ 2019च्या निवडणुकांचा प्रचार कार्यक्रम त्यांच्या डोळ्यांसमोर दिसू लागला आहे, असे म्हणावे लागेल. त्या दृष्टीने यशवंत स्मृती दिनाचे औचित्य साधून राजकीय पक्ष जागृत झाल्यास नवल नाही. काँग्रेसने भाजप सरकारला नेहमीच विरोध केला आहे. तळ्यात वा मळ्यात अशी स्थिती त्यांची नाही. परंतु, इतर पक्षांनी आता राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. राज्यात स्व. चव्हाणांचे कार्य मौलिक व अजोड होते. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा द्रष्टा राजकारणी, विचारवंत, समाजसेवक अशी स्व. चव्हाण साहेबांची प्रतिमा होती. राज्य व केंद्र सरकारने जनतेची नाळ समजावून घेण्यापेक्षा उद्योगपती, विदेशी कंपन्या यांच्या देखभालीकडे लक्ष देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे, असे स्पष्ट दिसून येत आहे.

केंद्र सरकार दरवेळी परदेशातून नवे कर्ज काढून नवीन प्रोजेक्ट राबवण्याचा कार्यक्रम करत आहे. परंतु, केंद्र सरकारने आत्तापर्यंत ठोस कार्य केल्याचे दिसत नाही. नोटाबंदी, जीएसटी करातील फेरफार, कागदपत्रांसाठी जनतेला वेठीस धरणे, असे नतद्रष्ट कार्यक्रम सुरू असल्यामुळे शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांची अडवणूक होत आहे. जनतेचा रोष उफाळून आला की, सरकार यू-टर्न घेणार, या कचखाऊ धोरणाला काहीच अर्थ नाही. प्रत्येक सरकारचा उद्देश हा हवा की, जनतेला त्रास न होता विकास करणे. परंतु, केंद्र व राज्य सरकारच्या सातत्याने बदलाच्या धोरणामुळे जनतेस जर मानसिक, आर्थिक, सामाजिक त्रास होत असेल, तर हे धोरण कुचकामी आहे, याची सरकारला जाणीव होत नाही. यशवंतनगरीतून सर्व पक्षांनी नवा महाराष्ट्र घडवण्याचे रणशिंग जोमात फुंकले आहे खरे, पण समाजाशी नाळ राखणारे समाजकारण, राजकारण हवे, हेही तितकेच खरे.

– अशोक सुतार
8600316798