यशवंतराव यांचा संस्काराचा वारसा घेवून सुसंस्कृत राजकारण घडविण्याचा प्रयत्न करावा – कोलते

0

विजय कोलते स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई : आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा महामंगल कलश आणणारे आदर्श व कुशल राजकारणी यशवंतराव चव्हाण यांच्या आचार, विचार व संस्काराचा वारसा घेवून सुसंस्कृत राजकारण करित संपन्न महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुण्याचे माजी जि.प. अध्यक्ष विजय कोलते यांनी केले. कोलते यांना भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक व कवि लक्ष्मीकांत तांबोळी होते.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने या समितीचे संस्थापक, माजी जि.प. अध्यक्ष दिवंगत भगवानराव बापू लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गत पाच वर्षापासून राज्य स्तरिय पुरस्कार दिला जातो. समाजकारण, सांस्कृतिक, पत्रकारिता, साहित्य, शेती आदी क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणा-यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचा स्तूत्य पायंडा समितीने पाडला आहे. या वर्षी हा पुरस्कार पूणे जि.प. चे माजी अध्यक्ष व 87 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे (सासवड) स्वागताध्यक्ष विजय कोलते यांना हा पुरस्कार जेष्ठ साहित्यीक व कवि लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते देण्यात आला. येथील आद्यकवी मुकूंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी व्यासपिठावर विजय कोलते, लक्षमीकांत तांबोळी समारोह समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे सचिव दगडू लोमटे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरवात लोकनेते यशवंतराव चव्हाण, स्व. भगवानाराव लोमटे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर समारोह समितीच्या वतीने प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी व विजय कोलते यांचे समारोह समितीचे कोषाध्यक्ष सतिश लोमटे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार व यशवंतराव चव्हाण यांची मूर्ती देवून स्वागत केले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ति विजय कोलते म्हणाले की, भगवानराव लोमटे बापू हे माझे मार्गदर्शक होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा बीड जिल्हयात जोपासण्याचे काम बापूंनी केले. यशवंतराव साहेबांचा सुसंस्कृतपणाचा विचार पुढे घेवून जाण्याची आज नितांत आवश्यकता आहे. या प्रसंगी कोलते यांनी यशवंतरावांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. यशवंतरावांचा संस्काराचा वारसा आजही शरद पवार चालवत आहेत. अंबाजोगाई सारखी सासवड देखील पुण्यभूमि कर्मभूमि आहे.आमच्या पावन भूमित आचार्य आत्रे सारखे बहुगुणी व्यक्तीमत्वाचा वारसा लाभलेला आहे. आचार्य आत्रे हे सेक्सपिअर पेक्षा मोठे व्यक्तीमत्व होते. त्यासाठी सासवड मध्ये आचार्य आत्रे यांचे भव्य स्मारक उभा करण्याचा मानस व्यक्त केला. ‘‘हसल्या शिवाय शंभर वर्ष जगता येणार नाही’’ असा मंत्र आचार्य आत्रे यांनी दिला. साहित्याची चळवळ वाढवा त्याच प्रमाणे राजकारणात सुसंस्कृतपणा येण्याची गरज आहे.असे कोलते यांनी म्हंटले.

अध्यक्षीय समारोप करताना जेष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी अंबाजोगाईचे महत्व विषद करून भगवानराव लोमटे यांनी अंबाजोगाईला सांस्कृतिक चेहरा दिला. डागर बंधू यांचा ध्रुपद धमाल सारख्या कार्यक्रमाचे आयोजन बापूनी या नगरीत केले होते. माझ्या आयुष्याचा पहिला सन्मानित पुरस्कार बापूंनी दिला. बापूंनी विविध क्षेत्रात यशवंतरावांना अभिप्रेत असेच कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांची पिढी चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रास्ताविक करताना सचिव दगडू लोमटे म्हणाले बापूच्या नावाने हा राज्यस्तरिय पुरस्कार गत पाच वर्षापासून दिला जात आहे. या आधी यशवंतराव गडाख पाटिल, विजय कुवळेकर, ना.धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर यांना पुरस्कार देवून गौरवले. या वर्षी समितीने 87 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पूणे जि.प. चे माजी अध्यक्ष विजय कोलते यांना हा पूरस्कार देत आहोत. समारोह समितीच्या विविध उपक्रमाची दगडू लोमटे यांनी माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय समारोह समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी करून दिला तर सन्मान पत्राचे वाचन विवेक गंगणे (राडीकर) यांनी केले.यावेळी कै. भगवानराव लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिश वितरण जि.प. शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख व जेष्ठ पखवाज वादक उध्दव बापू आपेगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सभागृहात सर्वच स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.