अकोला : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोला येथील शेतकरी आंदोलनाची धुरा हाती घेऊन राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या नाकात दम आणला आहे. विदर्भातील शेतकरीप्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कापूस, सोयाबीन व धान यांच्या उत्पादनाला भाव मिळवून देण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असून, त्या स्थानिक शेतकरी नेते सहभागी झाले आहेत. काल सिन्हा यांनी पुकारलेल्या आंदोलनाने अचानक वळण घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यात सिन्हा यांच्यासह सुमारे अडिचशे शेतकर्यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून अटक करून घेतली होती. ऐन थंडीत हे आंदोलन चांगलेच पेटले असून, सिन्हा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा देऊन सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी केली. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन आपल्याशी चर्चा करावी व मागण्या मान्य कराव्यात, अशी अट यशवंत सिन्हा यांनी घातली असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरुच राहील, असा इशाराही दिला आहे.
हिवाळी अधिवेशनातही मुद्दा गाजणार
मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी, भूमिका यशवंत सिन्हा यांनी घेतल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दिला व शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागते ही लज्जास्पद बाब आहे, असे टीकास्त्र पवार यांनी डागले आहे. राष्ट्रवादीसह शिवसेना, भारिपनेही या आंदोलनास पाठिंबा देत रास्ता रोको केला. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातही हे आंदोलन गाजण्याची शक्यता आहे. सिन्हा यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता असून, शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण करु, असा इशाराही सिन्हा यांनी दिला आहे.
आंदोलन भाजपसाठी डोकेदुखी
मंगळवारी अकोला येथील पोलिस मुख्यालयातच यशवंत सिन्हा यांनी आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाच्या अडचणी आणखी वाढल्या. याच ठिकाणी त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. शेतकर्यांशी चर्चा करुन आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे त्यांनी सांगितले. सिन्हा यांनी शरद पवार यांच्याशीदेखील फोनवरुन चर्चा केली. पवारांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला व कार्यकर्त्यांना आंदोलनात उतरण्याच्या सूचनाही केल्यात. खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी होणार आहेत. भाजपच्या नेत्यानेच सुरु केलेल्या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा देत शेतकर्यांच्या मुद्द्यावरुन भाजपची कोंडी केली आहे. सर्व पक्षीय नेते या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची कोंडी झाली असून, डोकेदुखी वाढली आहे. सिन्हा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले.
सिन्हा यांना अटक व सुटका
अकोल्यात शेतकरी जागर मंचने कापूस, सोयाबीन आणि धान परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला भाजप नेते यशवंत सिन्हा यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परिषदेत बोलताना सिन्हा यांनी शेतकरी आता सर्जिकल स्ट्राईक करतील असा इशारा दिला. तसेच अकोल्यापासून आंदोलनाला सुरुवात करु अशी घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. शेतकर्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करु, अशी भूमिका सिन्हा यांनी घेतल्याने अखेर सोमवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या पोलिसांनी यशवंत सिन्हा व नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रात्री सुटका करण्यात आली होती. मात्र, यशवंत सिन्हा अटक करण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.
सिन्हा झाडाखाली झोपले
अकोल्यात आंदोलन छेडल्यानंतर पोलिसांनी सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारी दाखवली. मात्र, नकार देत सिन्हा यांनी झाडाखाली झोपणे पसंत केले. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेणार नाही असे त्यांनी प्रशासनाला बजावले. दुसरीकडे, शेतकर्यांच्या हक्कासाठी अकोला पोलिस मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या यशवंत सिन्हा यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा आणि वरुण गांधी हेदेखील पाठिंब्यासाठी थेट अकोल्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, सिन्हा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांनी फोनवर येणे टाळून सिन्हांना पीएशी बोला असा निरोप दिला. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच डावलल्याची भावना आहे, असा आरोप भाजपचे गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे.