बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचा अमृतमहोत्सव : रौप्य मुद्राचे अनावरण
पुणे : जागतिक स्तरावर अनेक संधी उपलब्ध असून चांगल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्जनशीलता आणि कृतीशीलता या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ घालून आपण आपली मुद्रा जागतिक पटलावर उमटवू शकतो. परंतु आपण सणोत्सवांमध्येच आपली क्रीयाशीलता खर्च करतो, अशी खंत ज्येष्ठ उद्योगपती डॉ. सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली.
बीएमसीसी अर्थात बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अमृतमहोत्सवी गीत आणि रौप्य मुद्राचे अनावरण नुकतेच करण्यात आले. माजी विद्यार्थी डॉ. सायरस पूनावाला यांना युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेटच्या डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचा यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आणि केपीआयटीचे चेअरमन रवी पंडित यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. पूनावाला बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, प्राचार्य चंद्रकांत रावळ, बाळासाहेब अनासकर, विठ्ठल मणियार, अरुण निम्हण, सचिन नाईक, राजेंद्र मराठे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. पूनावाला यांचा विशेष सत्कार
आपल्याकडे कामापेक्षा जीवनातील अन्य गोष्टींनाच खूप महत्त्व दिले जाते. मात्र, कमी सुट्टी आणि जास्त काम हे आपल्या जीवनाचे सूत्र असले पाहिजे. मी अतिशय कमी भांडवलात माझा उद्योग सुरू केला. सिरम कंपनीतर्फे माफक दरात विविध लसी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा वापर करणार्या रुग्णांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच मला हे यश प्राप्त झाले आहे. आजचा हा विशेष सत्कार स्वीकारण्यामागचे मुख्य कारण म्हणजे याद्वारे नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हे आहे, असे डॉ. पूनावाला यांनी पुढे सांगितले.
बीएमसीसीने दिली वक्तृत्वाची देणगी
वक्तृत्वाची देणगी मला बीएमसीसीकडूनच मिळाली. या महाविद्यालयामुळे मला व्यासपीठाचे धारिष्ट्य आले. बीएमसीसीचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात योगदान देत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. बीएमसीसीकडून मिळालेल्या विविध कौशल्यांचा परिणाम चिरकाळ टिकणारा असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. यावेळी बोलताना रवी पंडित म्हणाले की, बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांनी आज जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटवली आहे आणि सायरस पूनावाला हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहेत, असे रवी पंडित यांनी सांगितले.
नंदेश उमप यांचा विशेष सहभाग
कार्यक्रमाच्या प्रारंभी निलांगी कलंत्रे आणि प्रिया जोशी यांनी भरतनाट्यम् आणि कथकद्वारे गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण निम्हण यांनी केले. सचिन नाईक यांनी रौप्य मुद्राविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले, तर बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे खजिनदार राजेंद्र मराठे यांनी आभार मानले. प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’गाढवाचं लग्न’ या नाट्य प्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जुन्या चमूसह सादर झालेल्या या वगनाट्यात नंदेश उमप यांचा विशेष सहभाग होता. सुमारे वीस वर्षानंतर मोहन जोशी यांनी हा प्रयोग सादर केला.