यशाची उंची वाढत जाईल त्याप्रमाणे क्षितीजाची मर्यादा वाढते!

0

जळगाव । यशाची उंची वाढत जायला हवी व जशी तुमच्या यशाची उंची वाढत जाईल त्याप्रमाणे क्षितीजाची मर्यादाही वाढत जाते. यासाठी स्वतःची कला व कुशलता विकसित करण्याचे आवाहन उमविचे बीसीयुडी संचालक डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी केले. ते एस. एस. मणियार महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन क्षितीज 2016-17 पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, अ‍ॅड. प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. अंजली बोंदर आदी उपस्थित होते.

कलेची जपणूक करा
डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, कला ही एकटेपणात साथ देते म्हणून कलेची जपवणूक करा. त्यासाठीच स्नेहसंमेलन महत्वाचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जीवनातील मित्राचे महत्व सांगून मित्र जोडण्याचा सल्ला दिला. अ‍ॅड. पाटील यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी यांनी प्रास्तविक करून महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेवून उपस्थितांचे स्वागत केले.

विविध स्पर्धांचे आयोजन
सूत्रसंचालन गणेश सावळे, निवृत्ती माळी यांनी केले. स्नेहसंमेलन सचिव अजिंक्य काळे यांनी आभार मानले. स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवसी संपूर्ण दिवस अंताक्षरी, गीत गायन, संगीत खुर्ची, फॅशन शो या स्पर्धा घेण्यात आल्यात. तसेच विद्यार्थ्यांनी प्यार दिवाना होता है, आमे शांती ओम, हसीने जाने मन, ही पोरगी साजुक तुपातली, दमा दम मस्त कलंदर या गाण्यांचे गायन केले.

विद्यार्थ्यांमध्ये दिसला जल्लोष
गीत गायन स्पर्धेंत ही पोरगी साजुक तुपातली हे गीत सादर झाल्यावर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच विविध प्रकारच्या वेषभूषा करून विद्यार्थी व विद्यार्थींनी फॅशन शोमध्ये रम्प वॉक करत स्नेहसंमेलनात रंगत आणली. विद्यार्थीनीसाठी संगीत खुर्चींचे आयोजन करण्यात आले होते. अंताक्षरीच्या कार्यक्रमाने स्नेहसंमेलात जोष आला. विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी जुन्या व नवे गीत सादर करून स्नेहसंमेलनात रंग भरला.