कोलकाता : कुठलाही संघ हा कमजोर नसतो. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात मिळवलेल्या यशानंतरही बांगलादेशला कमकुवत समजणार नाही, असे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धीमान साहा याने स्पष्ट केले. साहाने सांगितले की,‘‘ रँकिंगच्या आधारे लोक विचार करू शकतात, की ते कमकुवत प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, हे त्या दिवसाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, आम्हाला परिस्थितीनुरूप खेळ करावा लागेल. ’’ गेल्या दोन कसोटी मालिकेत भारताने न्यूझीलंडला ३ -०, तर इंग्लंडला ४ -० ने मात दिली. मात्र, साहा म्हणाला की, ‘‘ बांगलादेशविरोधात नव्याने सुरुवात केली जाईल.’’
तो पुढे म्हणाला,‘‘ सर्व मैदानांवर चांगला खेळ करण्याची इच्छा आहे, भलेही तुम्ही जे ठरवता ते नाही केले, तरी तुमच्या विचारांमुळेच चांगला खेळ होतो.’’ बांगलादेशविरोधातील एकमेव कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया आॅस्ट्रेलियाविरोधात पुण्यात २३ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करेल. साहा म्हणाला की, ‘‘मला माहित नाही, की आॅस्ट्रेलिया संघ भारतात कधी येत आहे. सध्या आमचे लक्ष्य बांगलादेश कसोटी सामन्यावर आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाबाबत विचार केला जाईल.’’ बांगलादेश विरोधातील कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून हैदराबाद येथे सुरू होत आहे.