यश कायम राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यावेत

0

धुळे । भारतीय जनता पक्षाने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, पालिका, ग्राम पंचायत इ. निवडणुकांमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. पक्ष आज नंबर एकवर आहे. यशाची हीच परंपरा पुढेही चालू ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दीनदयाल उपाध्याय विस्तारक योजनेत सहभागी व्हा
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी धुळे येथील राम पॅलस या ठिकाणी आयोजिलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज कार्यक्रमात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उर्जा व प्रेरणा निर्माण करण्याच्या हेतूने तसेच 25 मे पासून सुरु होणार्‍या पंडित दिनदयाल उपाध्याय विस्तारक योजनेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झालेच पाहिजे असे आग्रह पूर्वक आवाहन केले. व धुळे जिल्ह्यातील विकास कामांना निधी अपुरा पडू दिला जाणार नाही असे आश्‍वासन दिले.

भरघोस सहकार्याबद्दल आभार
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ना.डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांसाठी केलेल्या भरघोस सहकार्याबद्दल जाहीर आभार मानले तसेच मनमाड – धुळे – इंदौर रेल्वेमार्ग, जलसिंचन योजना, 7 महामार्गांचे विस्तारीकरण व चौपादारीकरण अशी अनेक जन कल्याणाची व विकासाची कामे मार्गी लावले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमांमध्ये प्रा. अरविंद जाधव, संजय शर्मा, हिरामण आप्पा गवळी,मनोहर भदाणे, विनोद मोराणकर, भाऊसाहेब देसले, देवेंद्र पाटील आदि मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमास कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.