यश प्राप्तीसाठी नेहमी मोठी स्वप्ने बघा

0

जळगाव। जीवनात नेहमी यशोशिखर गाठण्यासाठी ध्येय ठरविणे गरजेचे आहे. ध्येय ठरवून ध्येय प्राप्तीसाठी मार्गक्रमण केल्यास यश प्राप्त होऊ शकते. जीवनात नेहमी मोठी स्वप्ने रंगविली पाहिजे. मात्र त्याच सोबत स्वप्नपूर्तीसाठी देखील प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन युपीएससी परीक्षेत राज्यातून दुसर्‍या आलेल्या प्रज्ञाचक्षू अल्पना दुबे यांनी केले. दिपस्तंभ फाऊंडेशनतर्फे शनिवारी 24 रोजी महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी त्या बोलत होत्या. कांताई सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत हे गरजेचे असून त्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

एका रात्रीत आयुष्यात अंधकार
अल्पना दुबे यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास मांडताना सांगितले की, दहावी पर्यंत इतर विद्यार्थ्यांसारखीच दृष्टी होती. मात्र दहावीत असताना अचानक एका रात्रीत डोके दुखायला लागले. त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर कायमची दृष्टी गेल्याचे कळले. त्या एका रात्रीत माझ्या आयुष्यात कायमचा अंधकार आला. त्यावेळी वाटले की सर्व काही संपले. मात्र या आघातातुन देखील मी स्व:ताला सावरु शकले, यासाठी त्यांनी भगवंताचे आभार मानले. त्यांच्या मनोगतावेळी अनेकाना अश्रू अनावर झाले होते.

नकारात्मक विचार मनात राहिले तर यश मिळणार नाही
अल्पना दुबे म्हणाल्या की, युपीएससी परीक्षेसाठी नियोजनाची गरज असते. परीक्षेसाठी जर व्यवस्थित नियोजन केले. तर यश नक्कीच मिळते. परीक्षेचा काळात अनेकदा उत्साह कमी करणाजया व्यक्ती देखील येतात. परीक्षा देत असताना असो वा जीवनाच्या परीक्षेत कधीही नकारात्मक विचारांना थारा देवू नका. नकारात्मक विचार मनात राहिले जर यश मिळणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
महाराष्ट्रातील यशस्वीतांचा सत्कार करण्यासाठी आयोजित सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.एन.रामास्वामी लाभले होते. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, दिपस्तंभ संचालक यजुर्वेद्र महाजन, जयदीप पाटील यांच्यासहदिव्यांग बांधव उपस्थित होते.