इन-युनिसनचे संचालक संदीप बर्वे यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि कामातील सातत्य महत्त्वाचे असते. यशस्वी होण्यासाठी महत्वकांक्षा असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, असे प्रतिपादन इन-युनिसनचे संचालक संदीप बर्वे यांनी केले. व्यवसायात येणार्या आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जावे, तसेच व्यवसाय वाढीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याची माहिती करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने व्यावसायिकांसाठी ‘फास्ट अॅण्ड राईट- 3’ या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मार्गदर्शन करताना बर्वे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, सचिव नीता अरोरा, प्रकल्पाधिकारी राम भोसले, निधी संकलक बाळासाहेब उर्हे, आनंद सूर्यवंशी, सारंग माताडे, रवींद्र भावे, संतोष जाधव, भाऊसाहेब पांगारे, सदाशिव काळे, पंकज जैन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे शशिकांत हळदे, विलास काळोखे, मनोज ढमाले, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.
नवनवीन क्लृप्त्या वापराव्यात
संदीप बर्वे पुढे म्हणाले की, आपलं छान चाललंय, असे म्हणणार्यांनादेखील वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असतेच. कारण दिवसेंदिवस व्यवसायामधील वाढत असणारी आव्हाने व्यावसायिकांसमोर आ वासून उभी आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा सुरू असलेल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरणे गरजेचे असते, असेही बर्वे यांनी उपस्थित व्यावसायिकांना सांगितले.
व्यावसायिकाकडे सहनशक्ती असावी
‘व्यावसायिक संघर्षाचे व्यवस्थापन व व्यवसाय वृद्धी’ या विषयावर व्यवसाय प्रशिक्षक लकमन काझी यांनी मार्गदर्शन केले. काझी म्हणाले की, व्यवसायात सहनशक्ती महत्त्वाची असते. गुणवत्तेला प्राधान्य देत ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ज्या व्यावसायिकाकडे सहनशक्ती असते; तो व्यावसायिक निश्चितच यशस्वी होत असतो, असे मत याप्रसंगी काझी यांनी व्यक्त केले.
थोरण बनणार हॅप्पी व्हिलेज
या व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरातून जमा होणारा निधी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने दत्तक घेण्यात आलेल्या मावळ तालुक्यातील थोरण गावाच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. थोरण गावामध्ये स्वच्छतागृहांची निर्मिती, गावातील शाळेत संगणक शिक्षण सुरू करणे, रस्त्यांवर सौरऊर्जेवरील दिवे बसविणे, व्यावसायिक प्रशिक्षण, सुदृढ विकासासाठी स्वच्छतेच्या व आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाच्या कामांमधून गावाला स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, यासारखी विविध कामे करून थोरण गावाला हॅप्पी व्हिलेज बनविण्याचा निर्धार रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनने केला आहे.