यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहालाच भारतीय संघात स्थान

0

मुंबई : यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहाचे भारतीय संघात स्थान जवळपास निश्चित झाले आहे. असे संकेत खुद्द निवड समिती अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी दिले. नाबाद द्विशतकी खेळी करून साहाने शेष भारत संघाला केवळ इराणी करंडकच जिंकून दिला नाही, तर आपला फॉर्म आणि तंदुरुस्तीही सिद्ध केली. इराणी करंडक सामन्यासाठी साहाला शेष भारत संघात स्थान दिले होते ते त्याच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यासाठी नव्हे, तर तंदुरुस्ती पाहण्यासाठी. राष्ट्रीय संघातील जो खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर जाईल त्याला देशांतर्गत स्पर्धेतून तंदुरुस्ती दाखवावी लागेल असा नियम आहे. सध्या तरी साहा पहिल्या पसंतीचा व पार्थिव पटेल दुसऱ्या पसंतीचा यष्टिरक्षक असेल, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

साहाने उपयुक्तता दाखविली
साहाला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमनाची संधी मिळालेल्या पार्थिवने दोन अर्धशतके केली. त्यानंतर गुजरातला रणजी विजेतेपद मिळवून देताना अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध अर्धशतक व शतकही केले होते. साहा हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. फॉर्मअभावी त्याला वगळण्यात आले नव्हते. आता तो तंदुरुस्त झाला असेल, तर त्याला संधी मिळणे क्रमप्राप्त आहे, असे प्रसाद म्हणाले. वेस्ट इंडीज दौऱ्यात शतक आणि न्यूझीलंडविरुद्ध कोलकात्यातील सामन्यात सर्वोत्तम अशी कामगिरी करून साहाने उपयुक्तता दाखवून दिली आहे.

पार्थिवचेही केले कौतुक
प्रसाद यांनी पार्थिवचेही कौतुक केले. त्याने राष्ट्रीय संघात संधी मिळताच चांगली कामगिरी केली. गुजरातलाही रणजी विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक खेळ केला. त्याच्यावरही आमचे लक्ष आहे. साहा व पार्थिव यांच्या गुणवत्तेत फारसा फरक नाही; पण कसोटी सामन्याचा विचार करता, सक्षम यष्टिरक्षणाला पसंती मिळत आहे. पार्थिवच्या यष्टिरक्षणात प्रगती झाली आहे आणि साहा अधिक चांगला यष्टिरक्षक आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.