… याआधीही कॅमेरुनने चेंडूशी केली होती छेडछाड

0

मुंबई । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात चेंडुशी छेडछाड केल्याप्रकरणी वादात अडकलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि सलामीचा फलंदाजी कॅमेरुन बेनक्राफ्टच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आयसीसीने या वादामुळे स्मिथवर एका सामन्याची बंदी घातली आहे, तर बेनक्राफ्टच्या खात्यात तीन निगेटिव्ह मार्क देण्यात आलेत. स्मिथवर 100 टक्के मॅच फीचा दंड तर बेनक्राफ्टवर 75 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आलाय. आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर बेनक्राफ्टने पिवळ्या रंगाच्या टेपने बॉलशी छेडछाड केली होती. ही गोष्ट नंतर कर्णधार स्मिथने स्वीकारली तसेच ही संघाची योजना होती. यात संघाचा लीडरशिप ग्रुप सामील होता असे त्याने यावेळी कबूल केले. हे प्रकरण ताजे असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आणखी एक झटका बसलाय. एका वेबसाइटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. यात ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्ट त्याच्या खिशात एक चमचा साखर टाकताना दिसतोय. हे प्रकरण अ‍ॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान घडले आहे. हा व्हिडिओसह सनचे रिपोर्टर डेविड कावर्डले यांनी ट्वीट केले. हा कॅमेरुन बेनक्राफ्ट आहे जो जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान खिशात साखर टाकताना दिसतोय. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हे फुटेज स्पष्टपणे दिसते आहे. या व्हिडिओबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोघांवर ही कारवाई केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमनची हकालपट्टी करण्यात आली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचे एका वर्षासाठी निलंबन झाले असले तरी त्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे. इंग्लंडमध्ये 2019 मध्ये होणार्‍या आयसीसी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत हे दोघेही खेळू शकतात. 2019 मध्ये होणारी आयसीसी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा 30 मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये या दोघांचाही विचार होऊ शकतो.

स्टिव्ह वॉ झाला निराश
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ हा केपटाऊन येथे झालेल्या तिसर्‍या कसोटीमधील चेंडू छेडछाड प्रकरणावरुन खिन्न झाला आहे. त्याने म्हटले आहे, की स्मिथच्या चेंडू कुरतडण्याच्या घटनेमुळे मी खूपच तणावग्रस्त आणि निराश झालो आहे. 52 वर्षांच्या स्टिव्ह वॉने पुढे म्हटले, की चेंडू कुरतडणे म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळावरील निष्ठेला हरताळ फासणे होय. या घटनेमुळे मी खूपच निराश झालो आहे. या घटनेनंतर हजारो ईमेल मला आले आहेत. या प्रकरणामुळे क्रिकेटच्या हजारो चाहत्यांनी खेद व्यक्त केला.