याचिका सुनावणीनंतरच आरोग्य प्रमुखांची नियुक्ती

0

पुणे । पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुखपदासाठी बुधवारी मुलाखती झाल्या. असे असले तरी जारी केलेल्या निकषांच्या विरोधात आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर सहा डिसेंबरला सुनावणी होणार असून, त्यावरच आरोग्य प्रमुखांची नियुक्ती अवलंबून आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्यप्रमुख पदाविषयी सध्या चर्चा सुरू आहे. या पदासाठी 25 जण रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी अनेकांची कागदपत्रे अपूर्ण होती. त्यांना मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, आरोग्य विभागातील अनेक अधिकार्‍यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोग्य विभागाचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी त्यांच्या नियुक्तीवेळी 2014 मध्ये आरोग्य प्रमुखांच्या निकषांमध्ये बदल केले होते. आरोग्यप्रमुख पदासाठी एमबीबीएस किंवा डिप्लोमा इन पब्लिक हेल्थची (डीपीएच) पदविका कॉलेज ऑफ फिजिशियन अथवा आरोग्य विज्ञान विद्यापीठातून घेतलेली असावी, असे निकष होते. त्या निकषांमध्ये बदल करताना डॉ. परदेशी यांनी पदविका कॉलेज ऑफ फिजिशियनऐवजी आरोग्य विद्यापीठातून घेतलेली असावी, असे निकष बदलले. त्यावर सरकारची संमतीही मिळवली. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता.

एमबीबीएस आणि डीपीएच पदवी आवश्यक
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एमबीबीएस आणि डीपीएच ही पदविका कॉलेज ऑफ फिजिशियन किंवा आरोग्य विद्यापीठातून घेतलेली असावी हे 2014 पूर्वीचे निकष कायम केले. ऑक्टोबरमध्ये पुन्हा झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृहानेही हेच निकष कायम करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आयुक्तांनी सर्वसाधारण सभेने घेतलेला निकषांचा निर्णय अमान्य करून आरोग्य प्रमुख पदासाठी एमबीबीएस पदवी तसेच डीपीएचची आरोग्य विद्यापीठातून पदविका घेतलेली असावी, हेच निकष जाहिरातीत नमूद केले. या निकषांना महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी विरोध दर्शवून हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.