बैलगाडा शर्यत बंदीचा परीणाम : व्यवसायासाठी व्यापारांना करावी लागते वणवण
शिक्रापूर(मंदार तकटे)। सध्या यात्रांचा हंगाम सुरू झालेला आहे. परंतु बैलगाडा शर्यतबंदीमुळे यात्रांमध्ये उत्साह राहिलेला नाही. यात्रा केवळ नावापुरत्या राहिल्याच्या दिसून येत आहेत. बैलगाडा शर्यतींना बंदी तर तमाशा कार्यक्रमांना वेळेची मर्यादा असल्याने यात्रांकडे गावकरी पाठ वळवताना दिसत आहे. सरकार मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
विविध गावातील यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. या यांत्राकडे शहरी भागात कार्यरत असणार्या नोकरदार वर्गाने पूर्णतः पाठ फिरवल्याचे दिसत आहे. बैलगाडा शर्यत ही यात्रांची संस्कृती होती. त्यावरच बंदी घातल्याने तसेच शासनाने केलेल्या दुर्लक्षतेमुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णतः कोडमडल्याचे दिसत आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरतात. निदान तोपर्यंत तरी बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, अशी आशा ग्रामस्थ बाळगून आहेत.
व्यावसायिकांची उपासमार
बैलगाडा शर्यत हे यात्रेचे मुख्य आकर्षण होते. परंतु युवा पिढीला चित्रात आणि व्हिडीओमध्ये बैलगाडा शर्यती दाखवाव्या लागत आहेत. याचा गंभीर परिणाम छोट्या व्यवसायिकांवर झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वीप्रमाणे या यात्रा गजबजत नसल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. राज्य आणि केंद्रसरकार या शर्यती सुरू करण्यासाठी अनुकूल दिसत नाही.
सकारात्मदृष्टीने पाहण्याची मागणी
गेल्या अडीच वर्षांपासून बैलगाडा शर्यतीबंद असल्या तरी आजही बैलांची मुलांप्रमाणे जपणूक केली जाते. वाजंत्री, भंडार विकणारे दुकानदार, बैलगाडा तयार करणारे कारागीर, बैलांच्या पायांना नाल मारणारे कारागीर, स्पीकर व्यवसायिक, बैलगाडा शर्यतीत निवेदन करणारे निवेदक यांचे व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने बैलगाडा शर्यतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, अशी मागणी जातेगाव येथील बैलगाडा मालक राजुशेठ इंगवले यांनी केली आहे.
तमाशाही लोप पावतोय!
गावकरी यात्रांसाठी वर्गणी देताना उत्साही दिसत नाही. जास्त वर्गणीसुद्धा पुरेशी नसल्याने कमी बजेटचा तमाशा फड यात्रेच्या दिवशी करमणूक म्हणून ठेवावा लागतो. तमाशामध्ये भरपूर कलाकार मंडळींचा भरणा असल्यामुळे कमी बजेटमध्ये तमाशा मिळत नाही. त्याचाच परिणाम यात्रांमधली तमाशा ही लोककलासुद्धा लोप पावत चाललेली दिसून येत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची चर्चा गावोगावच्या यात्रांमध्ये ऐकण्यास मिळू लागली आहे.
शर्यत घाटांची दुरवस्था
यात्रेमध्ये शर्यतींमुळे होणारी लाखो रुपयांची उलाढाल बंद झाल्याने अनेक छोटे मोठे व्यावसायिक पोटापाण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत. शर्यतीच्या घाटांची दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल रोडवल्याने स्थानिक दुकानदार, थंडगार पेयावाले, भेळवाले, हॉटेल व्यावसायिक मात्र मोठ्या अडचणीत आले आहेत. बैलगाडा या सगळ्यामुळे यात्रेमधील उत्साह मात्र फारच कमी झाला आहे. यात्रेचे गावपण हरवले आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन बैलगाडा शर्यत सुरू कराव्यात, अशी मागणी बैलगाडा मालक वारंवार करत आहेत.